Friday, September 4, 2026
HomeUncategorizedNashik Crime News : तपासाच्या नावाखाली 'पालक' टार्गेट; पोलीस ठाण्यात आठ तास...

Nashik Crime News : तपासाच्या नावाखाली ‘पालक’ टार्गेट; पोलीस ठाण्यात आठ तास ठेवले बसवून, सुरगाण्याच्या PSI चा कारनामा

वडिलांना आठ तास बसवून ठेवले

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात सहसंशयित करण्याची भीती दाखवत, त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात दिवसभर ताटकळत बसवून लाचेची मागणी करणाऱ्या सुरगाणा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाचा कारनामा समाेर आला आहे. अवघ्या वर्षभरानंतर सेवानिवृत्ती जवळ आलेली असताना लाचेच्या मोहातून संशयित उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी दवंगे (वय ५७) यांच्या खाकीवर डाग लागला आहे. 

तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी करून २० हजारांच्या तडजोडीवर किराणा दुकानातील एका खाजगी हस्तकामार्फत लाचेची रक्कम स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पीएसआय दवंगे व किराणा दुकानातील कामगार इब्राहिम वाणी या दोघांना ताब्यात घेतले. सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मुलावर बीएनएस कलम १३७(२) व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद असून तो नाशिकराेड कारागृहात हाेता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे करत हाेते. ​१९ जून २०२६ रोजी पीएसआय दवंगे यांनी संशयिताच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि दिवसभर पाेलिस ठाण्यात बसवून ठेवले.

एका हतबल आई-वडिलांच्या भीतीचा व लाचारीचा फायदा घेत, “तुम्हा पती-पत्नीलाही या गुन्ह्यात आरोपी करतो,” अशी धमकी दवंगे यांनी दिली. जर या प्रकरणात स्वतःला व पत्नीला आरोपी करायचे नसेल आणि तपासात मदत हवी असेल, तर ५०,००० रुपयांची लाच द्यावी लागेल, असा तगादा लावला. घाबरलेल्या आणि संकटात सापडलेल्या तक्रारदाराने अखेर २० जून रोजी नाशिक एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या कारवाई संदर्भाने सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पाेलिस निरीक्षक याेगेश शिंदे व पथकाने केली. 

​आदेश किराणात जाळे

​एसीबीने तक्रारदाराच्या अर्जावरून पडताळणी केली असता, पीएसआय दवंगे यांनी ५० हजारांवरून तडजोड करत २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर २१, २४ आणि ३० जून रोजी दवंगे यांनी लाचेची रक्कम घेण्यास टाळाटाळ केली. अखेर ३१ जुलै २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सुरगाण्यात सापळा रचला. दवंगे यांनी तक्रारदारास पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीकडे जाणाऱ्या रोडलगत ‘आदेश किराणा जनरल स्टोअर्स’ येथे बोलावले. येथील दुकानात काम करणारा खाजगी व्यक्ति इब्राहिम करीम वाणी (वय २८, रा. जामुनमाथा) याच्याकडे पंचांसमक्ष २० हजार रुपयांची लाचेची रक्कम सुपूर्द करण्यास सांगितले.

संवेदनशीलतेवर चिखलफेक 

​३० ते ३५ वर्षे पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर निवृत्तीचा काळ हा सन्मानाचा मानला जातो. मात्र, अवघ्या एका वर्षावर निवृत्ती आलेली असताना पीएसआय दवंगे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेसाठी स्वतःची वर्षांनुवर्षांची पत, मान-सन्मान आणि पेन्शन पणाला लावली आहे. तसेच या घटनेतून पोलीस ठाण्यातील खाजगी हस्तकांची लाचखोरीतील घुसखोरी आणि तपासाच्या नावाखाली नातेवाईकांचा मानसिक छळ हा गंभीर प्रकार समोर आला आहे. तर, संशयिताच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात तासनतास बसवून ठेवून, त्यांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे ही पोलीस दलाच्या संवेदनशीलतेवर चिखलफेक करणारी बाब आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोतवाली पोलिसांचा ‘नशे’विरोधात धडाका!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अवैध नशेच्या पदार्थांची विक्री आणि चोरीच्या घटनांवर कोतवाली पोलिसांनी गुरूवारी (3 सप्टेंबर) धडक कारवाई केली. एका दिवसात केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये...