
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या (Deolali Camp Police Station) हद्दीत १५ वर्षांच्या मुलाला चारचाकी (कार) चालवण्यास देणे वडिलांच्या चांगलेच अंगलट आले आहे. निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या अल्पवयीन चालकासह, त्याला गाडी (Car) चालवण्यास देणाऱ्या त्याच्या वडिलांवर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे निष्काळजी पालकांवर कायद्याचा बडगा उगारल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
देवळाली कॅम्प येथील गरीबदास मिठाईवाला दुकानाजवळ (Shop) २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पंधरा वर्षीय मुलगा मुलगा व्हेंटो कार सार्वजनिक रस्त्यावर वेगाने व निष्काळजीपणे चालवताना आढळून आला. चालक अल्पवयीन असल्याने त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पाहून हवालदार सचिन बोरसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. यावरून मुलाचे (Son) वडील संशयित वसीम युसूफ शेख (वय ४३, रा. हाऊसन राेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमांनुसार कारवाई
- भारतीय न्याय संहिता कलम २८१
- नवीन भारतीय न्याय संहितेनुसार, सार्वजनिक रस्त्यावर मानवी जीवन धोक्यात येईल किंवा कोणाला दुखापत होईल अशा रीतीने बेदरकारपणे अथवा निष्काळजीपणे कोणतेही वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. या कलमांतर्गत दोषी आढळल्यास ६ महिन्यांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
मोटार वाहन कायद कलम १९९(ए)
- अल्पवयीन मुलांकडून रस्ते अपघात किंवा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात कलम १९९ (ए) समाविष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास त्याचे पालक किंवा वाहनाचा मालकच दोषी मानला जातो.
- या कलमांतर्गत पालकांना २५ हजार रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची नोंदणी १ वर्षासाठी रद्द केली जाते. संबंधित अल्पवयीन मुलाला २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यास बंदी घातली जाते.




