नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पंचवटी परिसरातही एका संशयित प्रियकराने प्रेयसीस गुंगीचे औषध पाजून तिचे निर्वस्त्र फोटो काढून पाच लाखांची खंडणी (Extort) मागितल्याची घटना समोर आली आहे. फेसबुकवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत या फोटोंच्या आधारे मागील सहा वर्षांपासून संशयिताने महिलेकडून खंडणी उकळली असून पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश अशोक पगार (३०, रा. उत्राणे, सटाणा, ता. बागलाण) असे संशयिताचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
३५ वर्षीय पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार ती एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) कार्यरत आहे. सन २०२० मध्ये तिची ओळख नीलेश पगार याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून झाली. संशयित नीलेश बेरोजगार असून त्याने महिलेशी मैत्री वाढवली. २६ मार्च २०२० रोजी या दोघांनी पंचवटीतील गंगाघाटावर भेटण्याचे ठरवले. सकाळी १० वाजेच्या सुमारास भेट झाली असता, संशयिताने पीडितेची नजर चुकवून तिला पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक औषध मिसळून पाजले. हे पाणी प्यायल्यानंतर महिलेला चक्कर येऊ लागल्याने नीलेशने तिला जवळील हॉटेलमध्ये नेले.
त्या ठिकाणी पीडिता बेशुद्ध असताना त्याने तिचे निर्वस्त्र फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले. त्याच दिवशी सायंकाळी नीलेशने तिला फोन करून, ‘पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करेन’ अशी धमकी देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ही घटना २०२० मध्ये घडली असताना, पीडितेने मे २०२६ मध्ये तक्रार दाखल केली. इतकी वर्षे पीडिता हा मानसिक आणि आर्थिक त्रास का सहन करत होती आणि तक्रारीसाठी इतका विलंब का झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या पैशांच्या (Money) मागणीला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर तिने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पगारने आतापर्यंत नेमकी किती रक्कम उकळली, याचा तपास सुरू आहे. उपनिरीक्षक पंकज सोनवणे पुढील तपास करत आहेत.
मुद्दे
- सुरुवातीला हा प्रकार प्रेमसंबंधातून घडल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात हा खंडणी उकळण्याचा कट
- आतापर्यंत पाच लाख रुपयांची मागणी
- पीडितेने त्याला रोख रक्कम, बँकेचे धनादेश आणि ऑनलाईन स्वरुपात वारंवार पैसे दिले
- सहा वर्षांनंतर तक्रार; पोलिसांकडून तपास




