नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने नाशिकमधील (Nashik) एका नामांकित व्यावसायिक कुटुंबाकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हेशाखेने (Crime Branch) राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) पत्रव्यवहार केला आहे.
सलग दोन दिवस व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेजद्वारे संबंधित व्यावसायिक कुटुंबाला धमकावण्यात आले. “तुमच्यावर आणि घराभोवती ‘शूटर्स’ची नजर आहे. नाशिकमधील हा पहिला ‘कॉल’ असून पैसे न दिल्यास पहिली हत्या नाशिकमध्ये आणि तीही तुमच्याच घरात (House) होईल,” असा भीषण इशारा या कॉल्समधून देण्यात आला आहे. ही धमकी बिष्णोई टोळीचा संशयित आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील ‘वॉन्टेड’ शुभम लोणकर याच्या नावाने देण्यात आली आहे. त्यामुळे हा गंभीर कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. पीडित व्यावसायिक कुटुंब टोळीच्या निशाण्यावर का आले, याचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित कुटुंबाच्या सुरक्षेची दक्षता घेण्यात आली असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. खंडणीखोर व गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
आयपी ॲड्रेसचा शोध
धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेले व्हॉट्सॲप कॉल्स हे ‘इंटरनॅशनल नंबर’वरून आले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हे कॉल्स नेमके कोणत्या देशातून आले आणि त्याचा मूळ आयपी ॲड्रेस काय आहे, याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच, हे कॉल्स खरोखरच बिष्णोई टोळीने केले आहेत की लोणकरच्या नावाचा गैरफायदा घेऊन कुणी आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरचा वापर करून ‘फेक कॉल’ केला आहे, याचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. राज्य पोलीस महासंचालक कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.




