Wednesday, November 18, 2026
Homeक्राईमNashik Fraud News : टीडीआर व्यवहारात व्यावसायिकाला गंडा; ​२.६० कोटी उकळून जमीन...

Nashik Fraud News : टीडीआर व्यवहारात व्यावसायिकाला गंडा; ​२.६० कोटी उकळून जमीन परस्पर विकली, तिघांवर गुन्हा 

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बांधकाम आणि रिअल इस्टेट व्यवसायातील व्यावसायिकालाही विश्वासात घेऊन कशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला जाऊ शकतो, याचा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. टीडीआर क्षेत्र आणि पाथर्डी शिवारातील शेतजमीन खरेदीच्या तीन वेगवेगळ्या व्यवहारांत तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील (Family) तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी कोट्यवधींची रक्कम स्विकारून ना अंतिम डीआरसी प्रमाणपत्र दिले, ना साठेखत केलेली शेतजमीन दिली; उलट ती जमीन परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त करून विकल्याचे तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

​तिडके कॉलनी येथील रहिवासी आणि नामांकित बांधकाम व्यावसायिक राजेश सहदेवराव सोनवणे (वय ५५) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनवणे हे सन १९९७ पासून ‘वंदना कंस्ट्रक्शन’ आणि सन २०१७ पासून अथर्व विश्व बिडकॉन या भागीदारी फर्मच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. या फर्ममध्ये त्यांचा मुलगा अथर्व राजेश सोनवणे हेदेखील भागीदार आहेत.

​पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२३ पासून संशयित मुक्ताजी सखाराम गुंजाळ, मनीषा मुक्ताजी गुंजाळ आणि संपदा मुक्ताजी गुंजाळ यांनी सोनवणे पिता-पुत्रांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर टीडीआर क्षेत्र आणि शेतजमीन विक्रीचे तीन मोठे व्यवहार निश्चित करण्यात आले. मात्र, नोटरी करार आणि साठेखत करूनही संशयितांनी रक्कम उकळल्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ केली.या तिन्ही व्यवहारांत संशयितांनी चेकपेक्षा रोख रकमेवर अधिक भर दिल्याचे दिसून येते.

टीडीआर (TDR) व्यवहारातील दोन कोटी पाच लाख रुपये आणि शेतजमीन व्यवहारातील ५५ लाख रुपये, अशी एकूण दोन कोटी ६० लाख रुपयांची रक्कम स्विकारून संशयितांनी कोणताही व्यवहार पूर्ण केला नाही. पैसे परत देण्याबाबत किंवा डीआरसी प्रमाणपत्र नावावर करण्याबाबत फिर्यादीने वारंवार विचारणा केली असता संशयितांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश सोनवणे यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

व्यवहार-१

पहिल्या व्यवहारात नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व्हे क्रमांक ८१०/१३/१३/१ मधील टीडीआर स्वरूपातील ६२५ चौरस मीटर क्षेत्राचा व्यवहार २५ लाख रुपयांना ठरविण्यात आला होता. या टीडीआरचे अंतिम डीआरसी प्रमाणपत्र ३१ जुलै २०२३ पर्यंत अथर्व सोनवणे यांच्या नावावर करून देण्याचे निश्चित झाले होते. त्यापोटी फिर्यादीने पाच लाख रुपयांचा धनादेश (चेक) आणि २० लाख रुपये रोख, अशी संपूर्ण २५ लाख रुपयांची रक्कम संशयितांना अदा केली. या व्यवहाराचा रीतसर नोटरी दस्तही करण्यात आला होता. मात्र, मुदत संपूनही संशयितांनी डीआरसी प्रमाणपत्र दिले नाही.

व्यवहार-२

दुसऱ्या व्यवहारात नाशिक शहर (Nashik City) शिवारातील भूमापन क्रमांक ६५७/१३/१३/१ आणि ६५७/१३/१३/३ पैकी फायनल प्लॉट क्रमांक ३७२ मधील अंतिम टीडीआर क्षेत्राचा सौदा तब्बल दोन कोटी ३० लाख रुपयांना ठरला होता. या व्यवहारासाठी फिर्यादीकडून १५ मार्च, ५ एप्रिल आणि २० मे २०२३ रोजी टप्प्याटप्प्याने चेक आणि रोख स्वरूपात एकूण एक कोटी ८० लाख रुपये संशयितांनी स्विकारले. या व्यवहारासाठीही नोटरी दस्त करण्यात आला होता. परंतु, ठरलेल्या मुदतीत अंतिम डीआरसी प्रमाणपत्र न देता संशयितांनी ही रक्कमही अडकवून ठेवली.

व्यवहार-३

तिसऱ्या व्यवहारात मौजे पाथर्डी शिवारातील भूमापन क्रमांक १२५/२/अ पैकी पूर्वेकडील ४१.५ आर शेतजमीन ७५ लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरले होते. त्यानुसार २४ एप्रिल २०२३ रोजी रीतसर साठेखत करारनामा करण्यात आला. या व्यवहारापोटी फिर्यादीने पाच लाख रुपये चेकद्वारे आणि ५० लाख रुपये रोख, अशी एकूण ५५ लाख रुपयांची रक्कम संशयितांना दिली. मात्र, साठेखत अस्तित्वात असतानाही संशयितांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय ही शेतजमीन परस्पर मनोज दत्तात्रय काजळे यांना दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवून विकून टाकली.

ताज्या बातम्या