Wednesday, November 18, 2026
HomeनाशिकCrime Story : प्रेयसीची हौस अन्‌ बुलेटची चाेरी; 'बुलेटराजा' हेमंत भदाणेच्या गुन्हेगारी...

Crime Story : प्रेयसीची हौस अन्‌ बुलेटची चाेरी; ‘बुलेटराजा’ हेमंत भदाणेच्या गुन्हेगारी थराराची कहाणी!

​नाशिक | भारत पगारे | Nashik

गुन्हेगारीच्या (Criminal) विश्वात प्रत्येक गुन्हेगाराचा वावर हा वेगवेगळ्या कारणांसाठी असतो. कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतो, तर कुणी फक्त भाईगिरीच्या नादात कायद्याला आव्हान देतो. परंतु, प्रेयसीचे नखरे पुरविण्यासाठी, तिची हौस- मौजमजा भागविण्यासाठी आणि स्वतःच्या हौसेपोटी महागड्या बुलेटवर डल्ला मारणाऱ्या एका प्रेमवीर बुलेटचोराची कथा अंगावर काटा आणणारी आहे. साध्या दुचाकी चोरीपासून सुरू झालेला हा प्रवास चक्क दीड डझन बुलेट चोरी आणि परराज्यातील खुनाच्या गुन्ह्यापर्यंत कसा पोहोचला, याचा हा थरारक प्रवास!

- Advertisement -

​नोव्हेंबर २०१७ मधील कालावधी. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत अचानक दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. विशेष म्हणजे, यात साध्या-सुध्या गाड्यांपेक्षा महागड्या दुचाकी आणि प्रामुख्याने  बुलेट चोरीचे प्रमाण लक्षणीय होते. चोराची नजर केवळ बुलेटवरच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर, तत्कालीन निरीक्षक के. डी. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हेशोध पथकाचे तत्कालीन सहायक उपनिरीक्षक (सध्याचे एपीआय) समीर वाघ यांच्याकडे सोपविला. वाघ यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

काही दिवसांतच गंगापूर परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमधून बुलेट चोरीला गेल्याची तक्रार आली. ज्या इमारतीतून बुलेट चोरीला गेली होती, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पण, समीर वाघ यांनी इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या सर्व मार्गांचे सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्याचा मास्टरप्लॅन आखला. पुढील दोन दिवसांत गंगापूर रोड परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज स्कॅन करण्यात आले. एका फूटेजमध्ये चोरीची बुलेट आणि त्यावर स्वार असलेला एक संशयित कॅमेऱ्यात कैद झाला. या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला असता, तो सातपूरच्या गंगापूर शिवाराकडे जाताना दिसला. समीर वाघ यांनी सातपूर, अंबड, सिडको आणि गंगापूर परिसरातील खबऱ्यांच्या जाळ्यात हा फोटो (Photo) सोडला.

गाड्यांचा तोतया आणि त्याचा पेहराव लक्षात घेता, हा प्रताप करणारा संशयित हेमंत राजेंद्र भदाणे असल्याची माहिती वाघ यांच्या हाती लागली. तो गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनीत राहत होता. परंतु, पोलिसांनी तिथे छापा टाकला असता, तो गेल्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणाहून पसार झाल्याचे निष्पन्न झाले. भदाणे नाशिकमधून महागड्या दुचाकी चोरून त्या धुळे, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या परजिल्ह्यांमध्ये विकत असल्याचे तपासात समोर आले. समीर वाघ यांनी तांत्रिक विश्लेषण आणि नेटवर्कच्या आधारे त्याचा माग काढला. तो गेल्या काही महिन्यांपासून जळगावात लपून बसल्याची पक्की माहिती मिळाली.

वाघ यांनी आपल्या पथकासह जळगाव (Jalgaon) गाठले आणि सापळा रचून हेमंत भदाणेच्या आवळल्या मुसक्या. नाशिकला आणून कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडून ३ बुलेटसह तब्बल ८ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. ​न्यायालयीन कोठडी आणि नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात काही महिने काढल्यानंतर हेमंत जामिनावर बाहेर आला. पण, त्याने पुन्हा गुन्हेगारीचा मार्ग धरला. मे २०१८ मध्ये गंगापूर हद्दीतून पुन्हा बुलेट चोरीला गेल्याची तक्रार आल्यावर, समीर वाघ यांनी सूत्रे फिरविली. यावेळी तो सिन्नरमध्ये (Sinnar) लपल्याची कुणकुण लागली. वाघ यांनी सिन्नर गाठत त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून आणखी ५ महागड्या बुलेट जप्त केल्या.

​गर्लफ्रेंडचे नखरे अन् अॅलन की चा फंडा!

​चौकशीत हेमंत भदाणेची जी कहाणी समोर आली, ती थक्क करणारी होती. सर्वसामान्य घरातील, वडील छत्र हरपलेले आणि आईसोबत राहणाऱ्या हेमंतचे शिक्षण फारसे नव्हते. पोट भरताना त्याला गरीबीचे चटके बसत होते. अशातच त्याने पहिल्यांदा एक दुचाकी चोरून विकली. त्यातून मिळालेल्या पैशांनी त्याचे डोळे दीपले. महागड्या बुलेटच्या विक्रीतून माेठी रक्कम मिळत असल्याने त्याने केवळ बुलेटलाच टार्गेट बनवले. दरम्यानच्या काळात एका तरुणीवर त्याचे प्रेम जडले. प्रेयसीची नखरे, तिची हौस भागवणे आणि स्वतःची मौजमजा पूर्ण करण्यासाठी त्याला पैशांची नितांत गरज होती. तो नाशिक शहरातून ‘अॅलन की’ च्या साहाय्याने सेकंदात बुलेटचे लॉक तोडून पळवायचा आणि ती धुळे, जळगावसह थेट सोलापूरपर्यंत नेऊन विकायचा. मिळालेल्या पैशातून गर्लफ्रेंडसोबत हॉटेलिंग, मौजमजा आणि स्वतःची चैन चालवायची. 

खुनाच्या गुन्ह्यात गजाआड!

​बुलेट चोरीच्या गुन्ह्यांनी ‘फेमस’ झालेला हेमंत पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे त्रस्त झाला होता. त्याने नाशिक आणि महाराष्ट्र सोडून थेट परराज्यात पलायन केले. परंतु, गुन्हेगारीची सवय सुटत नाही, या न्यायाने मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर एका खुनाचा गंभीर गुन्हा दाखल झाला. या खूनाच्या प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या हा खतरनाक ‘बुलेटराजा’ मध्य प्रदेश पोलिसांच्याच कोठडीत असल्याचे समजते. एका प्रेयसीच्या प्रेमापोटी सुरू झालेला हा चोरीचा प्रवास अखेर तुरुंगाच्या काळकोठडीत आणि खुनाच्या गुन्ह्यात संपला.

ताज्या बातम्या

कुलगाम

मला अल्लाहला…मशीदीतून बाहेर येताच कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड लतीफ भटचा खात्मा

0
नवी दिल्ली | New Delhiजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कुलमाग हल्ल्याचा मास्टर माइंड, लश्कर ए तोयबाचा...