नाशिक | Nashik
महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरातला (Ashok Kharat) आज (दि.२४) रोजी पोलीस कोठडी संपत असल्याने नाशिक सत्र न्यायालयात दुपारी ३. ५० वाजता हजर करण्यात आले. यावेळी नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Court) खरातला पाच दिवसांची म्हणजेच दि.२९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज न्यायालयात सरकारी वकील आणि खरातच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यात सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत खरातच्या विरोधात अनेक पुरावे आहेत, काही पीडित महिला आता हळूहळू तक्रारीसाठी पुढे येत असल्याचा दाखला देत कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.
तसेच खरातकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याने ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले. खरातने खडे कुठून आणले, जे मिश्रित पाणी द्यायचे ते कुठून आणले? त्याच्याकडे २१ जिवंत काडतुसे आणि ५ वापरलेली काडतुसे सापडली आहेत, असा दावाही सरकारी वकील यांनी केला. खरात कस्तुरी वापरत होता, ती हरणाची शिकार करून आणली होती का? याचा तपास करायचा आहे. याशिवाय ‘सिद्ध दोष पूजा’ करण्यासाठी तो सांगत होता. त्यामुळे तो जे वाघ आणि साप दाखवायचा, ते जिवंत होते की नकली? याचा तपास करायचा आहे. तसेच पीडित महिलांची संख्या वाढत असल्याने त्याची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तिवाद केला.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : नराधम अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
तर खरातच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, सात दिवसांच्या तपासात मला शंका आहे. व्हिडीओ मीडिया आणि सोशल मीडियात गेले आहेत. लॅपटॉप, डिव्हीआरचा उल्लेख होतो आहे, पण पेंड्राईव्हचा उल्लेख का होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पिस्तूलचा परवाना होता, सगळा तपास झाला आहे. त्यामुळे पुढील पोलीस कोठडीची गरज नसून,
आवश्यक कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला.
खरात न्यायालयात काय म्हणाला?
युक्तिवाद सुरु झाल्यानंतर न्यायालयात खरात मान खाली घालून आपले बोट बघत होता. यावेळी त्याला न्यायधीशांनी काही बोलायचं आहे का असे विचारले? त्यावर मला साप, वाघ, या विषयी काही माहिती नाही, असे तो म्हणाला. यानंतर नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
खरातवर एकूण सहा गुन्हे दाखल
दैवीशक्तीचा बनाव आणि भविष्याची भीती दाखवून अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या साम्राज्याचे एकामागून एक थरकाप उडवणारे पदर उलगडू लागले आहेत. सोमवारी (दि. २३) खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) आणखी तीन महिलांनी धाडस दाखवत तक्रारी नोंदवल्याने, अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आकडा आता सहावर पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat : नराधम खरातचा खतरनाक ‘तोटका’; लोकसभा निवडणुकीवेळी महिला नेत्याला दिले होते ‘धक्कादायक निकाल’ लावण्याचे आश्वासन
खरातच्या घरात काय सापडलं
अशोक खरातच्या घरात ६ लाख ५३ हजार इतकी रोख रक्कम, लॅपटॉप, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर आणि राजमुद्रा, ३१ काडतुसे अशा वस्तू सापडल्या आहेत, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच मधामध्ये गुंगीचे पदार्थ मिसळून अशोक खरात महिलांचे शोषण करायचा. महिलांच्या पूजा विधी मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी असायच्या. हरणाची काळी आणि कस्तुरी, तो कस्तुरी कुठून मिळवायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे. तो ज्या वस्तू वापरत होता, त्याचा तपास करायचा आहे, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.




