Sunday, November 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अदखलपात्रच्या गुंत्यात अडकला 'न्यायाचा' श्वास; न्यायालयाच्या मनाई हुकुमानंतरही...

Nashik Crime News : अदखलपात्रच्या गुंत्यात अडकला ‘न्यायाचा’ श्वास; न्यायालयाच्या मनाई हुकुमानंतरही छळ सुरूच, अखेर सेवानिवृत्त RTO अधिकाऱ्याचा टोकाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कौटुंबिक कलह, मालमत्तेचा वाद आणि त्यानंतर सुरू झालेला मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ, या सर्वच कोंडीतून सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ए- आरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे (वय ५९) यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली हाेती. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष, पोलिसांकडे (Police) नोंदवलेल्या तक्रारी आणि कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाचे झालेले उल्लंघन पाहता, प्रारंभीच्या टप्प्यातच कठोर प्रतिबंधात्मक पावले उचलली असती, तर हा जीव वाचू शकला असता का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

- Advertisement -

हेमंत हेमाडे यांनी ८ जून २०२६ रोजी गंगापूर पोलिसांना (Gangapur Police) दिलेल्या जबाबात आणि त्यानंतर २० नोव्हेंबर २०२६ रोजी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात घटनाक्रमाचा तपशील समोर आला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी योगिता यांच्याशी नोंदणीकृत पुनर्विवाह केल्यानंतर मुलगा संशयित यश आणि मुलगी प्रियांका यांच्याकडून विरोध व त्रास सुरू झाल्याचे जबाबात नमूद आहे. एप्रिल २०२२ मध्ये घरगुती वादातून मारहाणीचा पहिला अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंद झाला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : न्यायालयात गेल्यास ‘शेवटची तारीख’ ठरवण्याची धमकी दिली अन् RTO अधिकाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं; मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढे जून २०२३ मध्ये तोडफोड व धमक्यांच्या तक्रारी, ऑक्टोबर २०२३ मध्ये दिवंगत पत्नी (Wife) वैशालीच्या श्राद्धादिवशी झालेल्या वादातील मारहाणीचा व विनयभंगाच्या प्रकारातील गुन्हा आणि त्यानंतर वेगळे राहण्याचा निर्णय असा घटनाक्रम पुढे सरकला. २०२६ मध्ये तर ३१ मार्च रोजी घरात शिरून झालेल्या हल्ल्यानंतर, एप्रिल व मे महिन्यातही पुन्हा अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले. अनेकदा तक्रारी व अदखलपात्र गुन्हे नोंद होऊनही परिस्थितीत निर्णायक वळण न आल्याने हेमाडे यांची असहायता वाढत गेल्याचे कागदपत्रांवरून समाेर आले आहे.  

न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन

​जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे हेमंत व पत्नी याेगिता हेमाडे यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. २० एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने संबंधित व्यक्तींना १०० मीटर अंतरापर्यंत न फिरकण्याचा मनाई हुकूम दिला होता. मात्र, या आदेशानंतरही २७-२८ एप्रिल आणि १८ मे रोजी घराजवळ येऊन शिवीगाळ केल्याचा, तसेच २० व २३ मे रोजी वाहनांवर अंडी, कांदे-बटाटे फेकल्याचा आरोप जबाबात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेज व मेसेजचे स्क्रीनशॉट्स पेन ड्राइव्हद्वारे सादर केल्याचेही त्यात म्हटले आहे. कायदेशीर आदेश असूनही रस्त्यावर आणि घराच्या उंबरठ्यावर सुरू राहिलेला हा तणाव परिस्थिती अधिकच चिघळवणारा ठरला.  

​तारीख आणि कोंडीचा पेच

​पत्नी योगिता हेमाडे यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, कुटुंबाच्या मालमत्तेवरील हक्क सोडण्यासाठी तसेच न्यायालयातील दावे व प्रकरणे मागे घेण्यासाठी मुलांकडून दबाव आणला जात होता. सुनावणीला हजर राहिल्यास तीच शेवटची तारीख असेल, अशी धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत आहे. या सर्व दडपणाखाली आणि न्यायालयात जाऊन हक्क मागण्याचीही मुभा उरली नसल्याच्या भावनेतून हेमाडे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  

ताज्या बातम्या

Nashik Crime News : न्यायालयात गेल्यास ‘शेवटची तारीख’ ठरवण्याची धमकी दिली...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik मुला-मुलींना लहानाचे मोठे केले, त्यांच्याच असह्य शारीरिक, मानसिक व आर्थिक छळाला आणि मालमत्तेच्या वादातून दिल्या जाणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून...