नवीन नाशिक | New Nashik
कंपनीचा फोटो व लोगो वापरून बनावट कंपनी स्थापन करत मूळ कंपनीच्या ऑर्डर परस्पर वळवून घेत त्याचे काम करून घेतले. त्यानंतर बनावट कंपनीच्या (Fake Company) नावाने बिले देत ग्राहकांकडून आलेली रक्कम स्वतःकडे वळवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद जगन्नाथ बागुल, पूर्वेष अरविंद बागुल, नेहा पूर्वेष बागुल आणि सुरेखा अरविंद बागुल (सर्व रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुनील जगन्नाथ बागुल (६८, रा. पाथर्डी गावाजवळ, नाशिक) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई (Action) करण्यात आली. जून २०१६ ते मार्च २०१८ या कालावधीत अंबड एम आयडीसीतील संजीत इन्स्ट्रुमेंट प्रा. लि. येथे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपींनी करून आसुआ संगनमत इंजिनिअरिंग नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीसाठी फिर्यादींच्या संजीत कंपनीचा फोटो व लोगो वापरून बनावटपणा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संजीत कंपनीच्या ऑर्डर आसुआ इंजिनिअरिंगकडे वळवून घेत त्याचे काम संजीत कंपनीकडून करून घेण्यात आले. मात्र, त्याची बिले आसुआ इंजिनिअरिंगच्या नावाने देऊन त्यातून मिळालेले पैसे (Money) परस्पर घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारातून फिर्यादींची तब्बल २५ लाख ३३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक व अपहार झाल्याचा आरोप आहे. तसेच संजीत कंपनीतील २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरी करून नेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुगले करीत आहेत.




