नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान वडाळागाव येथे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला मतदान केंद्रस्तरीय (Voting Centre) अधिकारी (बीएलओ) यांना दोन महिलांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोघींविरुद्ध पोलिसांत गुन्हा (Police Case) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूकसार शेख (वय ३८, रा. पखाल रोड) या १२४ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांतर्गत के.बी.एच. विद्यालय, वडाळागाव येथे बीएलओ म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी (दि. १४) दुपारी सुमारे १ वाजता त्या सहकारी अनम मनियार यांच्यासह विद्यालयात मतदार यादी विशेष पुनरीक्षणाचे काम करत होत्या. यावेळी शाहिस्ता शेख आणि हिना शेख या दोन महिला तेथे आल्या. फिर्यादीनुसार, मतदार नोंदणीचे काम थांबविण्याच्या उद्देशाने त्यांनी रूकसार शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. “तुम्ही आमच्याशी नीट बोलला नाहीत, तुमची मस्ती जिरवावी लागेल,” अशी धमकी देत दोघींनी त्यांच्याशी हुज्जत घातली.
त्यानंतर वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि दोघींनी रूकसार शेख यांना मारहाण (Beating) केल्याचा आरोप आहे. यावेळी मतदार यादीसंदर्भातील महत्त्वाचा डेटा असलेला मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून तो जमिनीवर आपटून फोडण्यात आला. घटना घडल्यानंतर दोन्ही महिला (Woman) तेथून पसार झाल्या. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शाहिस्ता शेख व हिना शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




