नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बहुचर्चित डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणाला (Manisha Jejurkar Case) आता कायदेशीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती संशयित पती तथा जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर आणि मानसाेपचार विभागप्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Court) या खटल्यास पटलावर घेण्यास मंजुरी दिली असून, मंगळवारपासून (दि. १७) या खटल्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला आणि सुनावणीला सुरुवात होणार आहे.
या प्रकरणात डॉ. स्वाती चव्हाण (Swati Chavan) सध्या सशर्त जामिनावर बाहेर असल्या, तरी मुख्य संशयित डॉ. नीलेश जेजुरकर याचा जामीन सत्र न्यायालयासह उच्च व सर्वोच्च न्यायालयातूनही फेटाळण्यात आल्याने तो अद्याप नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातच आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी डॉ. मनीषा जेजुरकर यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या बहीण प्रा. रोहिणी थोरात (रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित डॉ. नीलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉ. नीलेश हा जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता, तर डॉ. स्वाती हीदेखील त्याच विभागाच्या प्रमुख हाेत्या. पोलिसांनी तपास करत १८ सप्टेंबर रोजी डॉ. नीलेश याला, तर २० सप्टेंबर रोजी डॉ. स्वाती यांना अटक केली होती. डॉ. स्वाती यांना १० ऑक्टोबर रोजी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, डॉ. नीलेश यांचा जामीन अर्ज २८ ऑक्टोबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. परिणामी, २१ सप्टेंबरपासून कारागृहात असलेला नीलेश अद्यापही उच्च न्यायालयात नवीन जामीन अर्ज न केल्यामुळे तुरुंगातच आहे.
दोषारोप पत्रात डिजिटल पुरावे
तपासादरम्यान पोलिसांनी दोघांच्याही मोबाईलमधील चॅटिंग आणि कॉलिंगचे तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक विभागामार्फत हस्तगत केले आहेत. हेच पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले आहे. तब्बल १९३ दिवस न्यायालयीन लढा आणि विविध न्यायालयांचे दरवाजे ठोठावूनही डॉ. नीलेशचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण वैद्यकीय व कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले असून या खटल्यात काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फिर्यादीनुसार…
सन २०२१ पासून डॉ. नीलेश हे पत्नी डॉ. मनीषा यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत होते. घरातील किरकोळ गोष्टींपासून ते महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत एका त्रयस्थ महिला डॉक्टरच्या (डॉ. स्वाती चव्हाण) सल्ल्यानुसार वागत होते. चव्हाण यांच्या सांगण्यावरून कौटुंबिक विसंवाद वाढल्याने मनीषा यांना तीव्र मानसिक त्रास देण्यात आला. दरम्यान, ९ एप्रिल २०२६ रोजी एका महिला डॉक्टरच्या जबाबातून डॉ. नीलेशच्या विवाहबाह्य संबंधांना दुजोरा मिळाला होता. ५ मार्च रोजी एका लग्नसोहळ्यात झालेल्या जाहीर अपमानानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) मनीषा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने या प्रकरणात स्पष्ट गुन्हेगारी हेतू आणि चिथावणी दिसून येत असल्याचे न्यायालयाच्या आधीच्या निरीक्षणात नमूद झाले होते.




