नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जळगाव येथील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील संशयित तंजीर इनामदार याला शनिवारी (दि. २५) न्यायालयाने (Court) न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावल्याने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. तर, दुसरीकडे पीडित फिर्यादीची ‘उलट परीक्षा’ घेतल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याच्या तपासाधिकारी व पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांची नेमणूक तातडीने नियंत्रण कक्षात केली आहे.
ओळखीतील एकवीस वर्षीय विद्यार्थिनीवर (Student) लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पंचवटी पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित विद्यार्थी तंजिर इनामदार याला शनिवारी (दि. २५) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा तपास पथकाने न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तसेच, तंजिरचे वकील अॅड. स्वप्निल जाधव यांनीही एमसीआरची मागणी केली. युक्तिवादानंतर, न्यायालयाने त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केली. दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांनी फिर्यादी तरुणीला ‘उलटपक्षी चौकशी’च्या पिंजऱ्यात उभे केल्याचा प्रकार आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निदर्शनास आला. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तालयाने अंतर्गत चौकशी केली. त्यात, आमणे यांची वागणूक आणि तपास पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
पीडितेचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्याने संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी तातडीने कारवाई करत ज्योती आमणे यांची पंचवटी पोलीस ठाण्यातून शहर नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे. संशयित तंजिरवर पीडितेला बळजबरीने सिगारेट पिण्यास लावणे, मद्यपानाची सक्ती करणे आणि तिचे अश्लिल फोटो काढल्याचे गंभीर आरोप आहेत. विशेष म्हणजे, अत्याचारादरम्यान पीडितेच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि हातातील दोरे तोडून तिला विशिष्ट धर्माप्रमाणे कृती करण्यास भाग पाडल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मात्र, आता तंजिरला न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.





