Sunday, May 17, 2026
Homeक्राईमNashik Crime News : रक्ताळलेले हात अन् देवाचा धावा; काकवीपुरेची भक्ती आडगाव...

Nashik Crime News : रक्ताळलेले हात अन् देवाचा धावा; काकवीपुरेची भक्ती आडगाव पोलिसांनी इंदूरमध्ये संपवली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील आडगाव नाका परिसरात (Aadgaon Naka Area) जुन्या वादातून एका सलून चालकाची निर्घुण हत्या (Murder) करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आडगाव पोलिसांना (Aadgaon Police) यश आले आहे. नाशिक ते थेट मध्यप्रदेशातील इंदूर असा शेकडो किलोमीटरचा थरारक पाठलाग करून गुन्हेशोध पथकाने संशयिताला बेड्या ठोकल्या.

- Advertisement -

विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयित काकवीपुरे महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला गेला होता, मात्र कायद्याच्या हातांनी त्याला इंदूरमध्ये (Indur) गाठले. ९ मे २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास आडगाव नाक्यावरील ‘मधुर मिलन स्वीट्स’ समोर ही घटना घडली होती. मृत जयवंत यशवंत पवार हे तिथे उभे असताना, संशयित राजा उर्फ राजेंद्र विठोबा काकविपुरे (रा. येवला) याने वादाचा राग मनात धरून जयवंत यांच्यावर छातीजवळ धारदार चाकूने एक वार केला.

गंभीर जखम झाल्याने जयवंत यांचा मृत्यू (Death) झाला. या प्रकरणी गीता जयवंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर राजेंद्र पसार झाला होता. आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तातडीने गुन्हेशोध पथकाला तपासाचे आदेश दिले.

महाकाल दर्शन

डोंबिवली कनेक्शन : तांत्रिक विश्लेषणाद्वारे राजा हा येवला, मनमाडमार्गे डोंबिवली येथे पळाल्याचे पोलिसांना समजले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो तिथून सटकला. गुंगारा देऊन रेल्वेने थेट मध्यप्रदेशातील उज्जैन येथे ‘महाकाल’ दर्शनासाठी पोहोचला. तो देवाच्या चरणी आश्रय घेत असल्याची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी आपला मोर्चा मध्य प्रदेशाकडे वळवला. राजा हा उज्जैनहून इंदूरच्या दिशेने येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी इंदूर क्राईम ब्रँचशी संपर्क साधला. इंदूरमधील ‘सिल्व्हर मॉल’ परिसरात सापळा रचण्यात आला. नाशिक आणि इंदूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिताफीने ताब्यात घेतले.

या पथकाने केली कारवाई

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक विकास पंचमुख आणि त्यांच्या गुन्हेशोध पथकाने पूर्ण केली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पापाचा घडा अखेर भरलाच

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचा संपूर्ण ताबा घेऊन नामकर्ण आवारे सर्वेसर्वा बनत होते तेव्हाच अशोक खरात...