नाशिक | प्रतिनिधी | Nashik
न्यायाधिशांवर चप्पल फेकण्यासह खून, चोरी व प्राणघातक हल्ला असे ३६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चिपळूणच्या सराईत गुन्हेगाराने (Criminal) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) तुरुंग अधिकाऱ्यास जबर मारहाण (Beating) केली आहे. साहिल अजमल काळसेकर (रा. नायशी, चिपळूण) असे सराईत बंदीवानाचे नाव आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदींजनांना गैरवर्तणूक न करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात असताना काळसेकरने तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात (Nashik Road Police) गुन्हा (Case) दाखल झाला आहे. तुरुंग अधिकारी जगदीश अर्जुन ढुमणे (४१, रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
कारागृहातील मंडल कार्यालयामध्ये बंदींना (Prisoner) गैरवर्तणूक न करण्याबाबत सूचना केल्या जात होत्या. त्यावेळी संशयित काळसेकर हा दुमणे यांच्यासमोर आला. त्यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता साहिलने, ‘मी माझे डोके फोडून घेईल, आत्महत्या करून तुमचे नाव चिठ्ठीत लिहून ठेवील’ अशी धमकी दिली. तसेच काठी घेऊन ढुमणे यांना मारली. त्यास अडविले असता, त्याने धक्काबुक्की करीत मारहाण केली.
न्यायधिशांवरही भिरकावली होती चप्पल
शिक्षा भोगतांना अमरावती कारागृहाची सुरक्षा भेदून साहिलने २८ जून २०२२ रोजी त्याने पळ काढला होता. तो रत्नागिरी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत आहे. त्याच्यावर जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी मारामारी, अपहरण व इतर हेडखाली एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साहिलने न्यायालयात न्यायाधीशांवरही सुनावणीवेळी चप्पल फेकली होती. तसेच अनेक लोकांवर हल्ला केल्याचे गुन्हे त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.