Monday, March 16, 2026
HomeनाशिकNashik Crime News : डॉ. मनीषा जेजुरकरांचा 'मानसिक खेळ'? पतीची 'अटकपूर्व' साठी...

Nashik Crime News : डॉ. मनीषा जेजुरकरांचा ‘मानसिक खेळ’? पतीची ‘अटकपूर्व’ साठी धावाधाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दुसऱ्यांच्या मनातील गोंधळ सोडवणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्या स्वतःच्याच आयुष्यातील ‘पेच’ आता चव्हाट्यावर आला आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका असलेले जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर (Dr. Nilesh Jejurkar) पोलिसांना (Police) गुंगारा देत असून, अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि. १६) सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

गंगापूर रोडवरील (Gangapur Road) डी. के. नगरमधील रेवती ब्लू या घरात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली होती. त्यांची बहीण प्रा. रहिणी थोरात यांच्या फिर्यादीनुसार, २०२१ पासून डॉ. नीलेश यांनी पत्नी मनीषाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते. घरातील साध्या निर्णयांसाठीही ते हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर महिलेचा सल्ला घेत होते. त्यामुळे घरात सतत कलह होत होता. दुसऱ्यांचे मन वाचणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच्या पत्नीची ओढाताण मात्र ओळखली नाही, अशी चर्चा आता शहरात रंगली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. जेजूरकर बेपत्ता आहेत. गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली असून तांत्रिक तपासाद्वारे त्यांचा माग काढला जात आहे. दरम्यान, केवळ घरगुती वादच नव्हे, तर जिल्हा रुग्णालयातील त्यांच्या कार्यकाळातील इतर काही ‘कारनाम्यांची’ दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तपासाची व्याप्ती वाढल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

सोमवारी होणाऱ्या सुनावणीपर्यंत डॉ. जेजूरकर पोलिसांच्या हाती लागणार की त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सहाय्यक निरीक्षक हर्षल आहिरराव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या