बनावट सही, मंत्रालयाचे स्क्रीनशॉटस् वापरून पैसे उकळले
नाशिक | प्रतिनिधी
केवळ ओळखीचे दावे न करता थेट मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉटस्अॅप चॅटस् आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (CEO) हुबेहूब बनावट स्वाक्षरी असलेले डिजिटलाईज्ड नियुक्ती पत्र (Appointment Letter) तयार करून सुशिक्षित तरुणांची शिकार केली जात असल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. चांदवडला जाताना प्रवासात झालेल्या एका ओळखीतून सायबर चोरट्याने एका ३५ वर्षीय खासगी अभियंत्याला तब्बल १९ लाख ४३ हजार रुपयांचा गंडा घातला.
सायबर पोलीस ठाण्यात संशयित श्रीकांत नानासाहेब वानखेडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शासकीय यंत्रणेच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या या रॅकेटची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तक्रारदार तरुण हा पंचवटीतील अमृतधाम परिसरातील रहिवासी असून सुशिक्षित अभियंता आहे.
नेमकी घटना काय घडली?
डिसेंबर २०२४ मध्ये नाशिक ते चांदवड प्रवासादरम्यान त्याची भेट संशयित श्रीकांत वानखेडे याच्याशी झाली. वानखेडे याने आपण स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव येथे कार्यरत असल्याचे खोटे सांगितले. मंत्रालयातील बड्यांशी थेट संबंध असल्याचे भासवून त्याने अभियंत्याला नाशिक जिल्हा परिषदेत लिपिक/उपसहायक या पदावर कायमस्वरुपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. संशयित वानखेडे याने तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा हत्यार म्हणून वापर केला. नाशिक जिल्हा परिषदेचा अधिकृत लोगो आणि नाव वापरून बनावट नियुक्ती पत्र तयार केले. त्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हुबेहूब बनावट डिजिटल स्वाक्षरी केली आणि ते व्हॉटस्अॅपवर पाठवले.
संपादकीय : ३ जुलै २०२६ – क्षयरोगाचे वास्तव अन् कृतीची गरज
मंत्रालयातील वरिष्ठ सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी आपले बोलणे सुरू आहे, हे दाखवण्यासाठी संशयिताने मोबाईलवर खोटे चॅटस् आणि स्क्रीनशॉटस् तयार करून तक्रारदाराला पाठवले. यातून सुशिक्षित अभियंत्याचाही त्यावर विश्वास बसला. १६ डिसेंबर २०२४ ते २९ मे २०२६ या दीड वर्षाच्या काळात कधी मेडिकल टेस्ट, कधी फिटनेस प्रमाणपत्र तर कधी मंत्रालयातील मंजुरी आणि कागदपत्रांची पडताळणी अशी नवनवीन कारणे पुढे करत ऑनलाईन माध्यमातून तब्बल १९ लाख ४३ हजार रुपये उकळले.
सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. संशयित वानखेडे याने अशाच प्रकारे आणखी किती सुशिक्षित बेरोजगारांना बनावट स्वाक्षऱ्यांचे शासकीय लेटरहेड देऊन फसवले आहे का? तसेच शासकीय विभागातील कोणाचा यात छुपा पाठिंबा आहे का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.




