नाशिक | प्रतिनिधी | Nashik
माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याचा बनाव रचून, कुटुंबीयांना कारागृहात पाठवण्याची भीती दाखवत नाशिकमधील (Nashik) एका ७० वर्षीय सेवानिवृत्ताला सलग दहा दिवस डिजिटल अरेस्ट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सायबर संशयितांनी वृद्ध नागरिकाची तब्बल २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री रविशंकर मार्गाजवळील कुर्डुकर नगरात राहणारे आणि महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेले ७० वर्षीय नागरिक ५ ते १४ ऑक्टोबर दरम्यान या सायबर जाळ्यात अडकले. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन (Phone) आला. समोरील व्यक्तीने आपण ब्लू डार्ट कुरिअरमधून बोलत असल्याचे सांगत, त्यांच्या नावाने बँकॉकला जाणाऱ्या एका संशयास्पद पार्सलमध्ये ५ पासपोर्ट, ८ एटीएम कार्ड, १ लॅपटॉप, १२ सिमकार्ड आणि ४ किलो कपडे सापडल्याचा दावा केला. त्यानंतर हा कॉल एका बनावट पोलिस अधिकाऱ्याकडे जाेडला.
बनावट पोलीस अधिकाऱ्याने (Fake Police officer) गंभीर आवाजात वृद्ध नागरिकास, “तुमच्या मुंबईतील स्टेट बँक खात्याचा वापर नवाब मलिक यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात झाला आहे,” अशी भीती घातली. चौकशीत सहकार्य न केल्यास अटक होईल, असे सांगत व्हॉट्सॲप आणि सिग्नल ॲपवरून व्हिडिओ कॉल करण्यात आले. खांद्यावर नेमप्लेट असलेला वर्दीधारी व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आल्यामुळे आणि सीबीआयचे बनावट पत्र दाखवल्यामुळे तक्रारदार दबावाखाली आला.
तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत ही घटना कोणालाही सांगू नये, असा कथित गोपनीयतेचा करारही करून घेतला. याबाबत नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६(डी) तसेच भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३(5), ३१८(४), ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे तपास करत आहेत.
गुंतवणूक मोडून २२ कोटी नव्हे, २३ लाख नव्हे..
तपासणीच्या नावाखाली संशयितांनी वृद्धाच्या सर्व मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड मोडण्यास लावले. पैसे एका खात्यात जमा करून फिजिकल व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगत तात्पुरते खाते दिले. जेव्हा तक्रारदारांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा संशयितांनी आक्रमक पवित्रा घेत, तुमच्या घराबाहेर साध्या वेशातील पोलिस तैनात आहेत. पैसे ट्रान्सफर नाही केले, तर तुम्हाला, पत्नीला, मुलीला आणि जावयाला तात्काळ अटक केली जाईल,” अशी धमकी दिली.
असे झाले व्यवहार
१२ ऑक्टोबर रोजी: ६ लाख ८५ हजार रुपये
१३ ऑक्टोबर रोजी: १८ लाख १५ हजार रुपये
असे एकूण २५ लाख रुपये लिंकटेक कन्सलटन्सी प्रा. लि. खात्यात वर्ग
असे फुटले बिंग
२५ लाख रुपये मिळाल्यानंतरही सायबर भामट्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वृद्धाच्या पत्नीच्या नावावरील गुंतवणुकीचे पैसेही जमा करण्याचा तगादा लावला. यामुळे संशय बळावल्याने तक्रारदारांनी मुलीच्या पोलीस दलात असलेल्या मैत्रिणीशी संपर्क साधला. तिने हा डिजिटल अरेस्टचा प्रकार असल्याचे स्पष्ट केल्यावर वृद्धांच्या पायाखालची जमीन सरकली.




