नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिक्षणासाठी (Education) शहरात आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला (Girl Student) सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून, तिचे अश्लिल फोटो काढून ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. संशयिताने पीडितेला अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्याकडून ३० ते ४० हजार रुपयेही उकळले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) संशयित युवराज दिगंबर रायते (रा. अंतापूर, ता. जि. नाशिक) याच्याविरुद्ध पाेक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील (Dhule District) साक्री येथील मूळ रहिवासी असलेली १७ वर्षीय पीडित मुलगी ही नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून राहून सीईटी क्रॅश कोर्सचे क्लास करत होती. दरम्यान, सोशल मीडिया आणि मोबाईल संभाषणातून तिची संशयित युवराज रायते याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तिच्याशी जवळीक साधली व तिला फिरण्यासाठी कॉलेज रोड, त्र्यंबक रोड आणि सातपूर परिसरात नेले. तेथे तिचे अश्लिल फोटो काढून, ‘हे फोटो आई-वडिलांना दाखवीन व इन्स्टाग्रामवर व्हायरल करीन’ अशी धमकी दिली.
दरम्यान, यानंतर सीटी सेंटर मॉल (City Centar Mall) रस्त्यावरील सातपूरकडे जाणाऱ्या एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार (Rape) केल्यानंतरही संशयिताचा त्रास थांबला नाही. त्याने पीडितेकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास फोटो इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर व्हायरल करण्याची, तिचे शिक्षण थांबवण्याची व लग्न होऊ न देण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने संशयिताला आतापर्यंत टप्प्याटप्प्याने ३० ते ४० हजार रुपये दिले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
ताब्यात घेण्याची कार्यवाही
सततच्या ब्लॅकमेलिंग आणि त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम, आयटी अॅक्ट तसेच पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यक निरीक्षक तेजश्री आंबेकर तपास करत असून संशयितास ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे.




