नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) दापूर शिवारात (Dapur Shivar) मध्यरात्रीच्या सुमारास वन्यजीवांची शिकार करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा वनविभागाने (Forest Department) पाठलाग करत पर्दाफाश केला आहे. राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत शिकाऱ्यांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे, संशयितांकडून दोन मृत मोर आणि शिकार करण्यासाठी वापरलेला बेकायदेशीर गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सिन्नर परिसरात शिकारींचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सागर बाळू आगविले (रा. दोडी बुद्रुक, सिन्नर) आणि सुनील लक्ष्मण निरगुडे (रा. शिवडे, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित शिकाऱ्यांची नावे आहेत. सिन्नर वन परिक्षेत्र अधिकारी हर्षल पालेकर यांचे पथक शुक्रवारी (दि. १७) रात्री परिसरात गस्तीवर होते. शनिवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास दापूर शिवारात काही शिकारी शस्त्रांनिशी दबा धरून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी (Forest Department Worker) तातडीने आपली वाहने दूर उभी केली आणि अंधाराचा फायदा घेत संशयितांना चारही बाजूंनी वेढा घातला.
वनविभागाने झडती घेतली असता, त्यांच्याकडून गावठी बनावटीची बंदूक (कट्टा), रात्रीच्या वेळी पक्ष्यांचे डोळे दिपवून त्यांना असहाय्य करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन हाय-फोकस बॅटऱ्या आणि मोबाईल जप्त करण्यात आले. मात्र, वनविभागाचे पथक पोहोचण्यापूर्वीच शिकाऱ्यांनी दोन मोरांचा जीव घेतला होता. तपासादरम्यान घटनास्थळावरून या दोन मृत मोरांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईत (Action) ठाणगावचे वनपरिमंडळ अधिकारी तानाजी भुजबळ, सिन्नरचे वनपरिमंडळ अधिकारी दिनेश सरोदे आणि आकाश उपवने यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
अजामीनपात्र गुन्हा; ‘आर्म्स ऍक्ट’ची कारवाई
”राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणे हा कायद्याने अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. संशयितांवर ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी ‘भारतीय हत्यार कायदा’ (आर्म्स ऍक्ट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी कट्टा कुठून आला?
१) संशयितांकडे वन्यजीवांची शिकार करण्यासाठी हा गावठी कट्टा नक्की कुठून उपलब्ध झाला? याचे काही आंतरराज्यीय कनेक्शन आहे का?
२) यापूर्वी या दोघांनी परिसरात आणखी किती मोरांची किंवा इतर वन्यजीवांची शिकार केली आहे, तसेच ही शिकार कोणाला विकली जाणार होती? या दोन्ही अँगलने वनविभागाने पुढील तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.




