नाशिक | प्रतिनिधी | Nashik
झटपट श्रीमंत होण्याच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत सायबर चाेरट्यांनी शहरात आपले जाळे घट्ट केले आहे. शेअर मार्केटमधील भरघोस परतावा, ऑनलाईन टास्कच्या नावाखाली वर्क फ्रॉम होमचे आमिष आणि व्यवसायात भागीदारी देऊन दरमहा उत्पन्नाचे गाजर दाखवून नाशिककरांना तब्बल १ कोटी ७ लाख ५९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. एकाच दिवशी शहरातील तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी गंगापूर, नाशिकरोड व सायबर पोलीस ठाण्यांत (Nashik Road and Cyber Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली शहरात मोठी फसवणूक (Fraud) उघडकीस आली आहे.
भामट्यांनी वैल्थ डिस्कशन २३ या या व्हॉट्सॲप/ सोशल मीडिया (Social Media) ग्रुपच्या माध्यमातून आणि ९५९४९२८७६३, ८१०८६०१६९५ यांसारख्या विविध मोबाईल क्रमांकांवरून मखमलाबाद नाका परिसरातील फिर्यादींशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अवघ्या काही दिवसांत अनपेक्षित नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला आभासी नफा दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर, फिर्यादी व त्यांच्या साथीदारांकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ७५ लाख ९ हजार ६६२ रुपये विविध खात्यांत वर्ग करून घेण्यात आले. रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सायबरच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे तपास करत आहेत.
तर, केवळ ऑनलाईनच नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवहारातही नोटरी करून नागरिकांना गंडा घातला जात असल्याचे नाशिक रोड येथील घटनेवरून स्पष्ट झाले आहे. अविनाश विजय खताळ (वय ३०, रा. सामनगाव रोड) यांना संशयित गणेश अंबादास बिडगर व अंबादास रुंजा बिडगर (दोघे रा. दरेगाव, ता. चांदवड) यांनी पोल्ट्री व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवले. फार्मचे तिसरे शेड बांधून त्यातून येणाऱ्या नफ्यातून दरमहा ५०,० हजार रुपये नियमित देण्याचे आणि सर्व नफा-तोटा सहन करण्याचे आश्वासन दिले. यासाठी नाशिक रोड येथील जुन्या कोर्टाजवळ नोटरी दस्ताद्वारे २५ लाख रुपये घेतले. मात्र, ही रक्कम पोल्ट्री व्यवसायासाठी न वापरता बिडगर यांनी स्वतःचे वैयक्तिक कर्ज (Loan) फेडण्यासाठी वापरली. पैसे परत मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.
रेटिंगच्या जाळ्यात टास्क स्कॅम
गंगापूर रोड परिसरातील विश्वजीत सुनील काठे (वय ३३) यांना टेलिग्रामवर एक मेसेज आला. गूगल मॅपवर हॉटेल व रेस्टॉरंटला ५ स्टार रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवा आणि रोज घरी बसून पैसे कमवा, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. टास्क दिल्यानंतर सुरुवातीला छोटा नफा दाखवून बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर (नूर आलम सुभान अली अन्सारी) ५० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. पैसे पाठवल्यानंतर तुमचा बारकोड चुकला आहे, रिफंडसाठी आणखी १ लाख रुपये पाठवावे लागतील, अशी बतावणी करून अतिरिक्त पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काठे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.




