Friday, October 23, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : ​मान खाली, तोंडावर मास्क! खरातची गुर्मी उतरली; आता...

Ashok Kharat Case : ​मान खाली, तोंडावर मास्क! खरातची गुर्मी उतरली; आता ‘या’ फसवणूक प्रकरणात तीन दिवसांची पाेलीस काेठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैवी शक्ती, भविष्याची भिती आणि मंत्र-तंत्राचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करुन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन (Ashok Kharat) याची एकेकाळची ऐट आणि गुर्मी पूर्णतः उतरल्याचे बुधवारी (दि. ३०) नाशिक सत्र न्यायालयात पाहायला मिळाले. नेवासा येथील एका व्यापाऱ्याला बनावट खडे देऊन लाखो रुपयांना गंडवल्याच्या गुन्ह्यात नाशिक सत्र न्यायालयाने खरातला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

- Advertisement -

​एकेकाळी स्वतःला ‘कृष्णाचा अवतार’ म्हणवून घेणाऱ्या या भोंदूचा न्यायालयात उघडा पडलेला अवतार उपस्थित प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होता. दुपारी १२ वाजता पोलीस बंदोबस्तात अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. कधीकाळी अंगावर भपकेबाज कपडे आणि महागडे दागिने मिरविणारा खरात आज अंगात साधा पांढरा शर्ट, चेहऱ्यावर सुरकुत्या, तोंडावर मास्क आणि खाली घातलेली मान अशा अवतारात दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावरील भीती आणि उतरलेला नूर पाहता, कायद्याच्या आवळलेल्या पाशापुढे त्याची सर्व गुर्मी गळून पडल्याची चर्चा न्यायालय परिसरात रंगली होती. दुपारी ३ वाजेनंतर त्याच्या एका जामीन अर्जावर दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवादही झाला.

​नेवासा व्यापाऱ्याला असे गंडवले

अहिल्यानगर येथील व्यापारी राजेंद्र भागवत (रा. नेवासा) हे व्यवसायातील अडचणींवर उपाय शोधण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस लॅण्ड डेव्हलपर्सच्या कार्यालयात खरातला भेटले होते. त्यावेळी खरातने स्वतःला कृष्णाचा अवतार सांगत, मंत्र मारून पुष्कराज व हिऱ्याचे रत्न जडवून देतो, ज्यामुळे दिव्य शक्ती प्राप्त होऊन व्यवसायात भरभराट होईल, असे आमिष दाखवले. भागवत यांच्याकडून २० ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या आणि २ लाख ६२ हजार रुपये रोख उकळले. मात्र, नंतर सोन्याऐवजी पिवळ्या धातूच्या अंगठ्यांमध्ये अवघ्या पाच हजार रुपयांचे बनावट खडे देऊन २ लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले हाेते.

२४ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी

भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजलेली असल्याने, महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये २० मार्च २०२६ पासून विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तपास सोपवण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक अमोल भारती, किरणकुमार सूर्यवंशी यांच्यासह २४ पोलिस अधिकारी व कर्मचारी या प्रकरणाचा दिवस-रात्र तपास करत आहेत. खरातविरुद्ध दाखल १८ गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराचे असून उर्वरित फसवणूक व अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत आहेत. १८ मार्चपासून खरात कोठडीत असून, सरकारवाडा पोलिस आता या बनावट रत्नांच्या फसवणूक प्रकरणी त्याची कसून चौकशी करणार आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि अहिल्यानगरचे वकील परिमल फळे काम पाहत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...