नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गंगापूररोडवरील (Gangapur Road) बारदान फाटा येथे रविवारी (दि. २४) दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मैत्रिणीचा मृत्यू झाल्यावर तिच्या मृत्यूस आपणच कारणीभूत असल्याच्या भावनेतून दुचाकीचालक मित्राने गळफास घेऊन जीवन संपवले. तिचा मृत्यू (Death) आपल्याच चुकीमुळे झाल्याचे शल्य मनाला बोचत असल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले असून इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे.
नीलेश शिवाजी पाटील (२१, रा. परिश्रम हाईटस्, चेतनानगर, इंदिरानगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर मैत्रिणीच्या (Friends) अपघाती मृत्यूस कारणीभूत असल्याचा (फेटल) गुन्हा गंगापूर पोलिसांत दाखल होता. या अपघातानंतर चार दिवसांनी म्हणजेच दि. २८ रोजी रात्री त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. दुचाकी स्लिप होऊन युवती रस्त्यावर पडल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोखाली सापडून तिचा करुण अंत झाल्याची भीषण घटना गंगापूर गावाकडून सातपूरकडे येताना बारदान फाटा येथे रविवारी (दि. २४) सायंकाळी घडली होती.
यात माही मनीष शर्मा (१८, रा. नयनतारा गोल्ड, चेतनानगर, नाशिक) हिचा मृत्यू झाला होता. रविवारी माही ही मित्र नीलेश शिवाजी पाटील याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच १५ केबी ५५६६) सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान गंगापूर गावाकडून आनंदवल्लीकडे येत होती. त्यावेळी बारदान फाटा येथे नीलेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याने बारदान फाटा येथे पोहोचताच सिग्नलवर चुकीच्या बाजूने वाहने ओव्हरटेक केली. याचवेळी पावसाच्या (Rain) पाण्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती स्लिप झाली. तेव्हा माही उजव्या बाजूने रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या टेम्पोखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे (Gangapur Police Station) हवालदार कमलाकर मोरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने दुचाकीचालक व माहीचा मित्र नीलेश याच्याविरोधात प्राणांतिक अपघातासह अन्य कलमान्वये फिर्याद दाखल केली होती. या अपघातात (Accident) तोदेखील किरकोळ जखमी झाला होता तर दुचाकीचेही नुकसान झाले होते. उपचारानंतर व पोलिसांच्या प्राथमिक कार्यवाहीनंतर तो घरीच होता. दरम्यान, अपघातासह इतर नैराश्यातून त्याने गळफास घेऊन अखेर जीवन संपवले.
दोन्ही कुटुंबे पोरकी
माहिचा अचानक मृत्यू झाल्याने तिचे कुटुंब मानसिक धक्क्यातून अद्याप सावरलेले नाही. तोच आता माहिचा मित्र नीलेश यानेदेखील मृत्यूला कवटाळले. या दोन्ही घटनांत शर्मा व पाटील कुटुंब तरुण मुलांना पोरकी झाली आहेत.





