नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फक्त नऊ हजार रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादात एका नराधमाने मित्राच्या पोटात चाकू भाेकसून निर्घृण खून (Murder) केला. इतकेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोधडीत आणि पोत्यात बांधून गच्चीवरील पाण्याच्या टाकीमागे लपवून ठेवला. वैष्णव मिलिंद शिंदे (वय ३३, रा. कामगार नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री परिसरात दुर्गंधी पसरल्याने या हत्याकांडाचा उलगडा झाला. सातपूर पोलिसांनी (Satpur Police) वेगाने तपास चक्र फिरवित अवघ्या १२ तासांत ही ‘मर्डर मिस्ट्री’ उकलून मुख्य संशयित कृष्णा राकेश दुसाने(वय १९, रा. कामगारनगर) याच्या नाशिकराेड रेल्वेस्थानकातून मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णव आणि संशयित दुसाने हे दोघे जिगरी मित्र होते. दुसाने याने वैष्णवला काही दिवसांपूर्वी नऊ हजार रुपये उसने दिले होते. हेच पैसे (Money) परत मागण्यासाठी शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी दोघे कामगार नगरातील साईबाबा मंदिरामागील एका उंच घराच्या गच्चीवर बसले होते. तिथे दोघांनी मद्यपान केले. यानंतर दुसानेने पैशांचा तगादा लावला. मात्र, वैष्णवने पैसे देण्यास नकार तर दिलाच, उलट त्याची जोरदार थट्टा उडवली व धमकी दिली. हाच अपमान जिव्हारी लागला. मद्याच्या नशेत आणि रागाच्या भरात दुसाने याने खिशातील धारदार चाकू काढून थेट वैष्णवच्या पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात वैष्णव रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर दुसाने पुरता भांबावला.
मृतदेह (Dead Body) खाली आणायचा तर रस्त्यावर लोकांची रहदारी होती. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने गच्चीवरच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्याने घरातून एक गोधडी आणि रिकामे पोते (गोणपाट) आणले. वैष्णवचा मृतदेह त्यात कोंबला आणि दाेरीने आवळून तो गच्चीवरील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला लपवून संशयित पसार झाला. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मृतदेह तिथेच पडून हाेता. यानंतर वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने सीसीटीविही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. रात्रीतूनच तब्बल १२ संशयितांना ताब्यात घेऊन खाकीचा इंगा दाखवला. तेव्हा मुख्य संशयिता दुसाने याने गुन्ह्याची कबुली दिली. केवळ नऊ हजार रुपयांच्या उधारीतून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिस कारवाई करत आहेत. यात आणखी काही संशयितांचा सहभाग उघड हाेण्याची शक्यता आहे.
’गूगल’चा माग आणि पोलिसांचा प्लॅन
रविवारी रात्री परिसरात असह्य दुर्गंधी पसरल्याने कुणीतरी सातपूर पाेलिसांना काॅल केला. यानंतर, पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, सचिन खैरनार यांच्यासह पथकाने धाव घेतली. गांभीर्य ओळखून श्वान पथकातील ‘गूगल’ आणि हॅन्डलर गणेश कोंडे यांना पाचारण करण्यात आले. ‘गूगल’ने घटनास्थळावरून संशयास्पद मार्गाचा माग काढत पोलिसांना महत्त्वाचे सुगावे दिले.
मुद्दे
-नऊ हजारांसाठी मित्राचा गच्चीवर गेम
मृत वैष्णवसह त्याचे मित्र नशेबाज
-वैष्णव पावभाजीच्या हातगाडीवर कामगार
-दोन दिवसांच्या सीसीटीव्हीत वैष्णव कैद झालाच नाही
-नशेडी मित्राने खून करुन चोर पावलांनी काढला पळ
-घटनास्थळी पाेलिसांनासह श्वान पथकास पोहचण्यात अडचणी
-घरांचे जिने खराब, परिसरात कामगार वर्ग भाडोत्री रुमवर वास्तव्यास




