नाशिक | प्रतिनिधी | Nashik
व्यावसायिक वाद आणि कॉन्ट्रॅक्ट कमिशनच्या कारणातून एका ५४ वर्षीय बांधकाम व्यावसायिकावर टोळक्याने जीवघेणा हल्ला (Attack) करत मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. ६) रात्री दहाच्या सुमारास जुना गंगापूर नाका (Old Gangapur Naka) परिसरात घडली. हल्लेखोरांनी मारहाण व दमदाटी करत व्यावसायिकाकडील ४३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ६० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वाश्रमीचा राजकीय पदाधिकारी व खासगी ठेकेदार संशयित ऋषिकेश चौधरीसह विकी ढोले आणि त्याचे इतर ५ ते ६ साथीदार यात गुंतल्याचे समाेर येत आहे. धात्रक फाटा येथील रहिवासी भरत रामदास सोनवणे (वय ५४) हे बांधकाम व्यावसायिक (Construction Professional) आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार भागीदार व खासगी ठेकेदार शरद देवरे याच्यामार्फत वर्षभरापूर्वी त्यांची ओळख संशयित ऋषिकेश चौधरी याच्याशी झाली होती. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ऋषिकेश चौधरी याने सोनवणे यांना फोन करून शरद देवरेबद्दल विचारणा केली. फोनवर शिवीगाळ करत त्याने सोनवणे यांच्याकडे त्यांचे लोकेशन मागितले.
त्यानंतर काही वेळातच चौधरी, विकी ढोले आणि त्यांचे इतर ५ ते ६ साथीदार कारने जुना गंगापूर नाका येथे पोहोचले. तुमचे खूप कॉन्ट्रॅक्ट चालतात आणि तुम्ही कमिशन खाता; शरद देवरे कुठे आहे, त्याला आज संपवूनच टाकतो, असा आरडाओरडा करत संशयितांनी सोनवणे यांना गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. घटना घडत असतानाच शरद देवरे आणि मित्र प्रसाद जोशी त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी चौधरी याने फोन करून आणखी ८ ते १० साथीदारांना घटनास्थळी बाेलविले. सर्व संशयितांनी सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. साेनवणे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी ऋषिकेश चौधरी, विकी ढोले आणि इतर साथीदारांविरोधात मारहाण, लूटमार, जीवे मारण्याची धमकी आणि बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारख्या विविध कलमांनुसार गुन्हा (Case) दाखल केला आहे.
दागिने आणि रोख रक्कम लुटली
मारहाणीच्या या गोंधळात चौधरी याने ६० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने तोडून घेतल्याचा आराेप साेनवणे यांनी फिर्यादीत केला आहे. तर संशयित विकी ढोले याने सोनवणे यांच्या खिशातील ४३ हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली, असही म्हटले आहे. कमिशनचे पैसे दिले नाहीत तर सर्वांना मारून टाकू, अशी धमकी देत हे टोळके घटनास्थळावरून पसार झाले.




