Sunday, September 13, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : पंधरा शाळांचे मुख्याध्यापक रडारवर; हृदयविकारामुळे गरुडची रुग्णालयातून चाैकशी

Shalarth ID Scam : पंधरा शाळांचे मुख्याध्यापक रडारवर; हृदयविकारामुळे गरुडची रुग्णालयातून चाैकशी

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक करुन केलेल्या ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) भाजप पदाधिकारी तथा शिक्षण संस्थाचालक संशयित संजय भास्कर गरूड याच्या अटकेनंतर तपासाने वेगाने घेतला आहे. ‘एसआयटी’ने (विशेष तपास पथक) आता आपला मोर्चा गरूड याच्या शिक्षण संस्थेच्या तब्बल १५ शाळांच्या मुख्याध्यापकांकडे वळवला असून, बुधवारी (दि. २९) नाशिकमध्ये (Nashik) या मुख्याध्यापकांची एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात आली. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संजय गरूड (Sanjay Garud) हा २००६ पासून जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ‘शेंदुर्णी एज्युकेशन सहकारी सोसायटी’चा अध्यक्ष आहे. त्याने संस्थेतील १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट ‘शालार्थ आयडी’ मिळवून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल १४१ कर्मचाऱ्यांचे मंजुरी आदेश २८ ऑगस्ट २०१९ या एकाच दिवशी निर्गमित करण्यात आले होते, त्यावर तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव याच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसआयटीने गरूडच्या ताब्यातील १५ शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटिसा बजावून चौकशीसाठी पाचारण केले होते.

त्यानुसार बुधवारी नाशिकरोड गुन्हे शाखेच्या (Nashik Road Crime Branch) कार्यालयात १० ते १२ मुख्याध्यापक हजर झाले. सायंकाळी उशिरापर्यंत या सर्व मुख्याध्यापकांची बनावट वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या कागदपत्रांबाबत कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून बोगस भरतीचे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. तर, या घोटाळ्यात आतापर्यंत निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर आणि संस्थाचालक प्रशांत वाडिले यांना अटक झाली आहे. आता गरूडच्या मुख्याध्यापकांची चौकशी सुरू झाल्याने या घोटाळ्यात आणखी काही बड्यांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

​गरूडला हृदयविकाराचा त्रास

नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Station) मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात एसआयटीने सहावा संशयित म्हणून संजय गरूड याला सोलापूर येथून अटक केली होती. धुळ्यातील संस्थाचालक प्रशांत वाडिले याच्या अटकेनंतर गरूड सोलापुरात लपून बसला होता. न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ​दरम्यान, मंगळवारी (दि. २८) रात्री उशिरा गरूड याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एसआयटीने बुधवारी गरूडच्या वैद्यकीय अहवालासह न्यायालयात परिस्थिती मांडली. न्यायालयाने (Court) वैद्यकीय उपचारांचे गांभीर्य लक्षात घेऊन, रुग्णालयातूनच गरूडची चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

मुद्दे

  • – ‘एसआयटी’चा रोख कशावर?
    – ​बोगस मान्यतांचे केंद्र: संशयित गरूड याने बनावट मान्यता व शालार्थ आदेश नेमके कुठे, कोणाच्या मदतीने तयार केले आणि या रॅकेटमध्ये शिक्षण विभागातील आणखी कोणते अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत?
    -​ आर्थिक गैरव्यवहार: बेकायदेशीर नियुक्तीच्या बदल्यात संशयिताने किती कोटींचा आर्थिक लाभ मिळवला आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा वास्तविक कालावधी काय होता, याचा शोध घेतला जात आहे.
    -​ विभागीय व्याप्ती : नाशिक विभागातील एकूण ८४१ बोगस कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ६३८ कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची 15 कोटींची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सावेडी येथील डॉक्टरांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या विविध व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती व खोटे मालक उभे करून तब्बल 14 कोटी...