Monday, October 19, 2026
Homeक्राईमNashik Crime News : लोंढे टोळीच्या जामिनांची मालिका! 'बॉस'ची सुटका,...

Nashik Crime News : लोंढे टोळीच्या जामिनांची मालिका! ‘बॉस’ची सुटका, मुलाच्या अर्जावर २१ ऑक्टोबरला सुनावणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूरमधील गोळीबार प्रकरणातून (Satpur Firing Case) चर्चेत आलेल्या लोंढे टोळीच्या (Londhe Gang) न्यायालयीन लढाईला आता वेग आला आहे. टोळीचा म्होरक्या प्रकाश उर्फ बॉस लोंढे याला मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर त्याचा मुलगा भूषण उर्फ भाईजी यानेही कारागृहाबाहेर येण्यासाठी न्यायालयीन प्रयत्न सुरू केले आहेत. भूषणच्या जामीन अर्जावर २१ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, याच गोळीबार प्रकरणातील काही संशयित जामिनावर बाहेर असल्याने मोक्का खटल्यातील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

प्रकाश लोंढे (Prakash Londhe) याची १५ ऑक्टोबर रोजी कारागृहातून सुटका झाली. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२६ मध्ये नाशिक सत्र न्यायालयाने प्रकाश आणि त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना यांच्या जामीन अर्जांना नकार दिला होता. तपासातील नोंदीनुसार, प्रकाशने टोळीतील सदस्यांना सोन्याच्या २३ अंगठ्या वाटल्याचा, तर दीपकने खंडणीच्या पैशांचे पांढऱ्या पैशांत रूपांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा मुद्दा न्यायालयासमोर आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने प्रकाशला सशर्त जामीन दिल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले. आता भूषणच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. कारागृह प्रशासनासह संबंधितांचे म्हणणे न्यायालयात सादर झाले असून, तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर न्यायालय निर्णय घेणार आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरची सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरातील ऑरा बारमध्ये तरुणांमध्ये वाद झाला होता. खुर्च्या-टेबलांची तोडफोड झाल्यानंतर बाउन्सर्सनी संबंधितांना बाहेर काढले. मात्र, बारखाली पुन्हा वाद उफाळला. तपासानुसार, प्रकाश लोंढे आणि त्याचे साथीदार तेथे पोहोचले. या पुढील संघर्षात ग्राहक वरुण तिवारी याच्या डाव्या पायावर चाकूने वार करण्यात आले, तर शुभम पाटील याने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याने तिवारी जखमी झाला.

दरम्यान, या प्रकरणात संशयित प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, अमोल पगारे, देवेश शेरताठे, शुभम गोसावी, सनी उर्फ ललित विठ्ठलकर, शुभम निकम, राहुल गायकवाड, निखिल निकुंभ आणि संदीप गांगुर्डे यांच्यासह अन्य संशयितांची नावे आहेत. बारचालक बिपिन पटेल आणि त्याच्या साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल आहे. उपलब्ध माहितीनुसार, पटेल, शेट्टी, गोसावी, जोशी, शेरताठे, वाघमारे, निकम आणि गायकवाड हे जामिनावर बाहेर आहेत.

मोक्का खटला नियमित

गोळीबार, प्राणघातक हल्ले, खंडणी आणि अन्य गुन्ह्यांतील कथित सहभागाच्या पार्श्वभूमीवर लोंढे टोळीविरुद्ध सातपूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून खटला सुरू आहे. त्यात भूषण लोंढे, शुभम उर्फ भुऱ्या पाटील, वेदांत चाळगे, प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे व इतरांचा समावेश आहे.

वर्षपूर्तीलाच लाेंढे बाहेर

नाशिक शहरात गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कायद्याचा बालेकिल्ला मोहीम सुरू झाल्यानंतर या गोळीबार प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असताना संबंधित गुन्ह्यांचे खटले महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. प्रकाश लोंढे याच्या जामिनानंतर भूषणच्या अर्जावर २१ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आणि त्यानंतर न्यायालयाकडून घेतला जाणारा निर्णय याकडे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...