Wednesday, November 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजHemant Hemade Suicide Case : गॅस एजन्सी ते मालमत्तेचा वाद; मुलगा, सासऱ्याच्या...

Hemant Hemade Suicide Case : गॅस एजन्सी ते मालमत्तेचा वाद; मुलगा, सासऱ्याच्या कोठडीत २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ 

भाग्यश्री, प्रियंकाचा शोध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ए-आरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे (वय ५९) यांच्या आत्महत्या प्रकरणात ( Suicide Case) आता तपासाची चक्रे नव्या दिशेने फिरली आहेत. केवळ मुलाचा विरोध आणि मालमत्तेचा वाद इतक्यापुरता हा विषय मर्यादित न राहता, गॅस एजन्सीचा व्यवसाय सांभाळणारा संशयित मुलगा यश, खासगी व्यवसाय करणारा त्याचा सासरा उमदी, तसेच संशयित यशची पसार पत्नी भाग्यश्री व हेमाडे यांची मुलगी प्रियंका कुणाल खोपकर या कौटुंबिक-व्यावसायिक साखळीची आणि ‘एनसी’ (अदखलपात्र) गुन्ह्यांच्या पलीकडील घटनाक्रमाची गंगापूर पोलिसांकडून पडताळणी सुरू झाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या यश हेमंत हेमाडे (Hemant Hemade) आणि त्याचा सासरा मल्लिकार्जुन उमदी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली असून, भाग्यश्री व प्रियंकाच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. ​हेमाडे यांच्या आत्महत्येमागे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक संघर्ष, मालमत्तेचा वाद आणि शारीरिक-मानसिक छळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संशयित यशचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आणि त्याचा सासरा उमदी याचा खासगी व्यवसाय या पार्श्वभूमीवर मालमत्तेचा वाद नेमका कसा व का चिघळला, तसेच त्यातून हेमाडे यांच्यावर दबाव आणण्याचे काम कसे केले जात होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली. ​दुसरीकडे, गेल्या चार वर्षांत हेमाडे यांच्या तक्रारींवरून नोंद झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यांची आणि कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशांची पाळेमुळे तपासण्याचा पैलूही समोर आला आहे.

एप्रिल २०२२ मध्ये घरगुती वादातून मारहाणीचा पहिला अदखलपात्र गुन्हा (Case) नोंद झाल्यापासून जून २०२३ मधील तोडफोड व धमक्यांच्या तक्रारी, ऑक्टोबर २०२३ मध्ये दिवंगत पत्नी वैशाली यांच्या श्राद्धाच्यादिवशी झालेल्या वादातील मारहाण व विनयभंगाचा गुन्हा, तसेच मार्च २०२६ मध्ये घरात शिरून झालेल्या हल्ल्यानंतर एप्रिल व मे २०२६ मध्ये नोंद झालेले अदखलपात्र गुन्हे अशा वारंवार घडलेल्या घटनांनंतरही प्रतिबंधात्मक पावले का पडली नाहीत, याचाही तपास होणे गरजेचे मानले जात आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अटक केलेला संशयित यश हेमाडे व त्याचा सासरा उमदी यांची पोलीस कोठडी रविवारी (दि.२३) संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा मालमत्तेचा वाद कसा व का झाला आणि यामागील इतर कारणांचा तपास करण्यासाठी न्यायालयाने दोघांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हेमाडे यांची सून भाग्यश्री आणि हेमाडे यांची मुलगी प्रियंका कुणाल खोपकर यांच्या शोधासाठी गंगापूर पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. तपास पोलिस निरीक्षक जमीर शेख करत आहेत.  

उंबरठ्यावरील तणाव

​जीवाला धोका निर्माण झाल्याने हेमंत हेमाडे व पत्नी योगिता हेमाडे यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. २० एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने संबंधित व्यक्तींना १०० मीटर अंतरापर्यंत न फिरण्याचा मनाई हुकूम दिला होता. मात्र, या आदेशानंतरही २७-२८ एप्रिल आणि १८ मे रोजी घराजवळ येऊन शिवीगाळ केल्याचा, तसेच २० व २३ मे रोजी वाहनांवर अंडी, कांदे-बटाटे फेकल्याचा आरोप जबाबात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज व मेसेजचे स्क्रीनशॉट्स पेनड्राइव्हद्वारे सादर केल्याचेही नमूद आहे. कायदेशीर आदेश असूनही रस्त्यावर आणि घराच्या उंबरठ्यावर सुरू राहिलेला हा तणाव परिस्थिती अधिकच चिघळवणारा ठरला.

​तारखेची भीती आणि वाढती असहायता

​हेमंत यांची पत्नी योगिता यांनी २० नाेव्हेंबर राेजी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये नोंदणीकृत पुनर्विवाह केल्यानंतर मुलगा यश आणि मुलगी प्रियंका यांच्याकडून विरोध व त्रास सुरू झाला. कुटुंबाच्या मालमत्तेवरील हक्क सोडण्यासाठी तसेच न्यायालयातील दावे व प्रकरणे मागे घेण्यासाठी मुलांकडून दबाव आणला जात होता. सुनावणीला हजर राहिल्यास तीच शेवटची तारीख असेल, अशी धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत आहे. या सर्व दडपणाखाली आणि न्यायालयात जाऊन हक्क मागण्याचीही मुभा उरली नसल्याच्या भावनेतून हेमाडे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समाेर आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्त्याचे काम धिम्या गतीने; वाहनचालक...

0
ओझे l विलास ढाकणे | Oze नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळालेली असताना, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काही भागांत अचानक डांबरीकरण सुरू...