कराड | Karad
राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील बदलती राजकीय समीकरणे आणि भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या भाजपसोबत NDAमध्ये गेल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रितीसंगमावर त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अभिवादन केलं. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया यांना दोन्ही राष्ट्रवादींचं प्रितीसंगम होणार का? असा सवाल विचारण्यात आला. तसेच शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीसोबत वाटाघाटी करत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरही सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे.
१२ वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करु नका
कालपर्यंत तुम्ही केंद्रीय मंत्री होणार अशी चर्चा सुरु होती, आता मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे, यावर काय सांगाल, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मिश्कीलपणे म्हटले की, गेले 12 वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करु नका. 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय, मला या कुठल्याही कथांमध्ये रस नाही. मला फक्त दुख: एका गोष्टीचे आहे की, ज्या पॉलिसी मेकिंगसाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबद्दल गांभीर्याने मला कोणीच विचारत नाही. मी सध्या चार संयुक्त संसदीय समित्यांवर (JPC) आहे. देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेश आहे. माझं भाग्य आहे की,राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, त्याच्यावर एखादा जरा कोणी प्रश्न विचारला तर मला अंत:करणापासून आनंद होईल. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. चार जेपीसींमध्ये देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरु आहे. यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
पडसाद : एका न झालेल्या राजीनाम्याची चित्तरकथा!
गोकुळ सुनावणीवर काय म्हणाल्या सुळे?
गोकुळ प्रकरणामध्ये आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, “मी बंटीदादांच्या मागे आहे. मला असं म्हणावं लागतं की सहकार चळवळ अनेक मोठ्या नेत्यांनी जिवंत ठेवली. एखादं मत कमी जास्त झालं तर सरकारने समांजस्य दाखवून चर्चेतून मार्ग काढला असता तर बरं झालं असतं. माझी सरकारला विनम्र विनंती आहे. मी हात जोडून विनंती करते की गोकूळचा प्रश्न सोडवा. देशाची सेवा, देशासमोर जे आव्हान आहे त्याकडे लक्ष द्यावं,” असं आवाहन केलं.




