Thursday, November 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News : आईच्या हत्येची लेकीनेच दिली साक्ष; क्रूर पतीला जन्मठेप

Nashik Crime News : आईच्या हत्येची लेकीनेच दिली साक्ष; क्रूर पतीला जन्मठेप

मुलीचा जन्म अन् छळाचा तो थरार,

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुलगी झाली अन् ट्रॅक्टरसाठी माहेरहून पैसे (Money) आणावेत, या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला शारीरिक व मानसिक छळ एका विवाहितेच्या (Married Woman) क्रूर हत्येने संपला. पत्नीला खोलीत डांबून मारहाण करत, बेशुद्धावस्थेत विहिरीत फेकून देऊन हत्येचा (Murder) बनाव रचणाऱ्या नराधम पतीला नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात स्वतःच्या आईच्या हत्येचा थरार डोळ्यांनी पाहणाऱ्या चिमुकल्या दिव्याची प्रत्यक्षदर्शी साक्ष आरोपी पतीला गजाआड करण्यात निर्णायक ठरली.

- Advertisement -

​नाशिक येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयाने आरोपी पती भाऊसाहेब मधुकर ढिकले याला खुनाच्या आरोपात दाेषू ठरवून जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याशिवाय सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासू ताराबाई मधुकर ढिकले व नणंद गीता संपत आहेर यांना प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी, तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा बनाव रचणारा साथीदार अनिल निवृत्ती दळवी याला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक तालुका पोलीस ठाण्यात (Nashik Taluka Police Station) दाखल गुन्ह्यानुसार, सय्यदपिंप्री येथील अश्विनी भाऊसाहेब ढिकले हिचा विवाह १७ एप्रिल २००८ रोजी भाऊसाहेब ढिकले याच्याशी झाला होता. लग्नानंतर अश्विनीने मुलगी दिव्या हिला जन्म दिल्यानंतर तिची सासू, नणंद आणि पतीने मुलीच्या जन्मावरून व ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे आणण्याच्या मागणीवरून छळ सुरू केला. ​दरम्यान, १ सप्टेंबर २०१८ रोजी कपाटाचे कुलूप तोडल्याच्या वादातून संतप्त पती भाऊसाहेब याने अश्विनीला खोलीत डांबून काठीने चेहऱ्यावर व डोळ्यांवर बेदम मारहाण केली. अश्विनी बेशुद्ध पडल्यानंतर क्रूर पतीने तिला उचलून नेऊन शेतातील विहिरीत फेकून दिले. यात तिचा बुडून मृत्यू झाला.

तांब्या ठेवून अपघाताचा बनाव

​हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीच्या काठावर पाण्याचा तांब्या ठेवून, अश्विनी पाणी शेंदताना पाय घसरून पडल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात आणि वैद्यकीय पुराव्यांमध्ये मारहाणीच्या खुणा स्पष्ट झाल्याने हा अपघात नसून कट रचून केलेला खून असल्याचे निष्पन्न झाले.

​लेकीची धाडसी साक्ष

​सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील आर. पी. गावित व भानुप्रिया पेटकर यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. या खटल्यात सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला तो मयत अश्विनी यांची मुलगी दिव्या हिची साक्ष! आपल्याच डोळ्यांदेखत आईला झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेला प्रकार चिमुकल्या मुलीने न्यायाधीशांसमोर हिमतीने मांडला. मुलीची प्रत्यक्षदर्शी साक्ष, डॉक्टरांचे वैद्यकीय पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी पतीसह नातेवाईकांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

मुद्दे

​- न्यायालयाचा अंतिम निकाल
​- पती भाऊसाहेब ढिकले: खुनासाठी जन्मठेप + १० हजार रुपये दंड. (छळासाठी ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार दंड)
​- सासू ताराबाई ढिकले व नणंद गीता आहेर: छळवणुकीसाठी ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार रुपये दंड.
​- साथीदार अनिल दळवी: पुरावा नष्ट केल्याप्रकरणी (कलम २०१) ३ वर्षे सक्तमजुरी + १ हजार रुपये दंड.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...