नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मॅट्रिमोनिअल ॲपवर डॉ. सायली पाटील (Sayali Patil) नावाने बनावट प्रोफाइल तयार करून नाशिकमधील (Nashik News) एका नामांकित डॉक्टरला जाळ्यात ओढणारा भामटा दुसरा तिसरा कोणी नसून संकेत चव्हाण नावाचा २५ वर्षीय तृतीयपंथी असल्याचे पोलिसांनी (Police) केलेल्या तांत्रिक तपासात निष्पन्न झाले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांना कसे गंडा घालतात, याचा एक प्रकार नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत उघडकीस आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका भामट्याने तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांना गंडा घातला. अंबड हद्दीत राहणाऱ्या एका डॉक्टरने लग्नासाठी ‘मॅट्रिमोनिअल ॲप’वर नोंदणी केली होती. तेथे त्यांची ओळख ‘डॉ. सायली पाटील’ नावाच्या मुलीशी झाली.
संशयित संकेतने एआय व्हॉईस चेंजर ॲपच्या माध्यमातून तरुणीचा अत्यंत गोड आणि हुबेहूब आवाज काढून डॉक्टरशी संवाद साधला. इतकेच नव्हे तर मनमोहक फोटो पाठवून आणि नाशिकमधील (Nashik) ३ ते ४ नामांकित डॉक्टर आपले जवळचे नातेवाईक असल्याचे भासवून डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्ष भेट टाळत भ्रमणध्वनीवरूनच लग्नाची बोलणी पुढे सरकवण्यात आली. १३ जून ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत लग्नाची तयारी, अर्जंट पैसे लागत असल्याचे कारण, कपडे, दागिने व इतर खर्चाचे कारण सांगत ऑनलाईन पैसे तसेच एटीएम कार्ड हस्तगत करून डॉक्टरकडून तब्बल ११ लाख ८६ हजार रुपये उकळण्यात आले होते.
अशी झाली फसवणूक उघड आणि अटक
आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात येताच पीडित डॉक्टरने अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी बनावट प्रोफाइल धारक डॉ. सायली पाटील, तिचा कथित भाऊ लोकेश, सेवानिवृत्त काका आणि मनमत देसले या चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि ‘सीडीआरवरून माग काढत संशयित संकेत चव्हाण (वय २५, रा. नाशिक) याला बेड्या ठोकल्या.
सॅनिटायझर पिण्याचा बनाव
अविनाश नडविनकेरी यांच्या पथकाने संकेत चव्हाण याला ताब्यात घेतले तेव्हा त्याने पोलिसांसमोरही नाटक करण्यास सुरुवात केली. ‘फीट’ (ताण) येण्याचा आजार असल्याचा बनाव करत त्याने ‘सॅनिटायझर’ पिण्याचा प्रयत्न करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच तो नरमला. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला रीतसर अटक करण्यात आली.
तपासातील प्रमुख खुलासे
- संशयित संकेत चव्हाण हा तृतीयपंथी असून डॉक्टरशी बोलताना एआय व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करायचा, ज्यामुळे समोर तरुणीच असल्याचे डॉक्टरला वाटले.
- मॅट्रिमोनिअल ॲपच्या माध्यमातून संकेतने अशाच प्रकारे आणखी अनेक तरुणांना आकर्षित करून लुटण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे.
- सध्या संशयित संकेत चव्हाण पोलिस कोठडीत असून, त्याने उकळलेल्या ११.८६ लाख रुपयांचे काय केले आणि या फसवणुकीच्या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास अंबड पोलिस करत आहेत.




