नाशिक | Nashik
जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत लाचखोरांना जोरदार दणका दिला आहे. एका कंत्राटदाराच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या ४ टक्के लाच मागितल्याप्रकरणी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त (Malegaon Municipal Commissioner) रवींद्र जाधव यांच्यासह त्यांचा स्वीय सहाय्यक (PA) आणि महापालिकेचा अकाउंटंट अशा तिघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराच्या मंजूर (Bills) बिलाची रक्कम मोकळी करण्यासाठी मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव (Ravindra Jadhav) यांनी बिलाच्या एकूण रकमेवर ४ टक्के लाचेची मागणी केली होती. यानंतर एसीबीच्या पथकाने मालेगाव महापालिका आयुक्त संशयित रवींद्र जाधव, त्यांचा स्वीय सहाय्यक निलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर या तिघांनाही ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, तक्रारीनुसार संबंधित ठेकेदारांनी महानगरपालिकेमार्फत केलेल्या कामांची बिले बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तिघांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.
प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) विविध शासकीय विभागांमधील बडे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या गळाला लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांसारखा वरिष्ठ सनदी अधिकारीच लाचखोरीच्या प्रकरणात जाळ्यात सापडल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.




