Monday, September 28, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मॅनेजरला ८९ लाखांचा गंडा; पुणे,...

Nashik Fraud Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मॅनेजरला ८९ लाखांचा गंडा; पुणे, राजस्थानच्या खात्यांत पैसे वर्ग

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबई दहशतवाद विरोधी पथकातून (एटीएस) बोलत असल्याचा बनाव रचून, नाशिकमधील (Nashik) एका वयोवृद्ध मॅनेजरला डिजिटल अरेस्टची भिती दाखवून तब्बल ८९ लाख ९९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. सातपूर (Satpur) येथील एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कार्यरत असलेल्या या वयाेवृद्ध अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) पीडित मॅनेजरशी व्हॉट्सॲप क्रमांकांवरून (७५००१२०१३८, ८८९५८६३६२५, ९४५५८२८५७३, ८८९५७५७१९५) संपर्क साधला. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून जम्मू येथील एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. हे खाते दहशतवादी आदिल गौरीने मनी लाँड्रिंगसाठी वापरले असून, या गुन्ह्यात तुमचाही सहभाग आहे, अशी भीती संशयितांनी दाखविली.

​त्यानंतर, तुमच्या सर्व आर्थिक व स्थावर मालमत्तेची माहिती द्यावी लागेल तसेच बँक खात्यातील (Bank Account) सर्व रक्कम आरबीआयमार्फत तपासावी लागेल, असे सांगून त्यांना डिजिटल अरेस्टखाली ठेवले. अटकेच्या व कायदेशीर कारवाईच्या भीतीपोटी मॅनेजरने चाेरट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण ८९ लाख ९९ हजार रुपये वर्ग केले. हा प्रकार १७ ऑगस्ट २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला. त्यामुळे मॅनेजरचे बँक खाते रिकामे झाले आहे.  

पुण्यातील खात्यांतील रक्कम फ्रीज

या प्रकरणी २८ ऑगस्टला नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान मॅनेजरचे पैसे पुणे आणि राजस्थान येथील विविध बँक खात्यांत गेल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी तत्परता दाखवत पुण्यातील दोन संशयास्पद बँक खाती फ्रीज (गोठवली) असून, त्या खात्यांमध्ये एक कोटींपेक्षा जास्त रक्कम अडकली आहे. यामुळे पीडित मॅनेजरला त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

​कायदेशीर कलमे व तपास

या प्रकरणी बीएनएस कलम ३१८ (४), २०४, २०५, ३५१(२), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे तपास करत आहेत. कुठलीही पोलीस यंत्रणा, एटीएस किंवा सीबीआय फोनवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. 

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली....