पंचवटी | प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील पेठरोडवर एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड उघडकीस आले आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने तिच्या स्वतःच्या २६ वर्षीय प्रियकराचा गळा आवळून निर्घृण खून केला. पेठरोडवरील नवनाथनगर भागात सोमवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी महिलेला तात्काळ बेड्या ठोकल्या असून, या हत्याकांडात आणखी दोघा महिलांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अमोल पंढरीनाथ दांडगे (वय २६, मूळ रा. चौधरी मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित महिला सोनाली राजेंद्र गायकवाड (वय ३६, रा. साळवे चाळ, नवनाथनगर) हिच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा (IPC ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अमोल हा अविवाहित होता, तर संशयित आरोपी सोनाली ही विवाहित आहे. या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. अमोलच्या या संबंधांना त्याच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मात्र, घरच्यांचा विरोध झुगारून अमोल अवघ्या १५ दिवसांपूर्वीच हनुमानवाडीतील आपले घर सोडून पेठरोडवरील नवनाथनगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत लिव्ह-इनमध्ये राहण्यास आला होता. मात्र, ज्या प्रेयसीसाठी त्याने स्वतःचे घर सोडले, तिनेच त्याचा काळ बनून खून केला.
ही थरारक घटना सोमवारी (दि. २५) रात्री ९:३० ते मंगळवारी (दि. २६) पहाटे ३:०० वाजेच्या दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि अनैतिक संबंधांवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात संशयित सोनालीने कशाच्या तरी साहाय्याने अमोलचा गळा आवळला. यात अमोलचा गुदमरून मृत्यू झाला.
रुग्णालयात ‘चक्कर’ आल्याचा बनाव; डॉक्टमांमुळे गुपिताचा पर्दाफाश!
अमोल निपचित पडल्यानंतर आरोपी सोनालीने घाबरून शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने डॉक्टरांना “अमोल चक्कर येऊन पडला” असा बनाव रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासणीदरम्यान अमोलच्या गळ्यावरील काळे व्रण पाहून डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. अखेर शवविच्छेदन (Post Mortem) अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळल्यानेच झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सोनालीचा बनाव खोडून काढत तिला ताब्यात घेतले. मयत युवकाची धिप्पाड प्रकृती पाहता हा खून केवळ एका महिलेने केला नसून, यात तिने अन्य साथीदारांची मदत घेतली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे. या गुन्ह्यात एकूण ३ संशयित असण्याची शक्यता असून पोलीस त्या दृष्टीने सखोल तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक नितीन आंधळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपआयुक्त मोनीका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक नितीन आंधळे, सुनील पवार, सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांच्या फौजफाट्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.




