नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर परिसरातील (Satpur Area) स्वारबाबा नगर येथील अमरधाम विसावा परिसरात तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या (Attack) घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या मारहाणीतील एका संशयिताचा खंडणी व गोळीबाराच्या गुन्ह्यातील संशयित प्रकाश उर्फ ‘बॉस’ लोंढे याच्याशी नातेसंबंध असल्याचे समोर आल्याने, या प्रकरणामागे टोळीगत पार्श्वभूमी आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सातपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे सावट गडद होत असून, लोंढे टोळीशी (Londhe Gang) संबंधित संशयितांचा उच्छाद पुन्हा सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वारबाबा नगर येथील अमरधाम विसावाजवळ रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या हल्ल्यात अविनाश रतन पवार (वय २६, रा. महादेव नगर, सातपूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांपैकी स्वप्निल उर्फ काळ्या गायकवाड (वय २५) हा प्रकाश लोंढे याचा नातलग असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी सातपूर परिसरात (Satpur Area) खंडणी, गोळीबार, दहशत माजविणे आणि टोळक्याने मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. लोंढे टोळीतील काही सदस्य आणि म्होरक्या प्रकाश लोंढे कारागृहाबाहेर आल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याचा किंवा टोळीगत दहशतीचा धागा आहे का, याची पोलिसांकडून पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
फिर्यादी रतन कोंडाजी पवार (वय ५३, रा. महादेवनगर, सातपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अविनाश यास संशयित टोळक्याने अडवले. किरकोळ कारणावरून वाद घालत त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयितांनी दगड, फायटर आणि लोखंडी रॉडने अविनाशवर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात अविनाश यास गंभीर दुखापत झाली असून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
सातपूर पोलिसांत गुन्हा
घटनेनंतर अमरधाम विसावा आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घडणाऱ्या मारहाण आणि दहशतीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारी टोळ्यांवर कडक प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयित ओमकार शेलार उर्फ घाण्या (वय २८, रा. सातपूर कॉलनी), स्वप्निल उर्फ काळ्या गायकवाड (वय २५), लाल्या, चिक्या आणि इतर तीन ते चार अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १८९(२), १९०, १९१(१)(२) अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली असून, उपनिरीक्षक राहुल नळकांडे तपास करीत आहेत.




