
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गणेशोत्सवाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलीस (Nashik Police) ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ९९ हून अधिक संशयितांना शहरातून तडीपार करण्यात आले होते; मात्र, यातील अनेक गुन्हेगार तडीपारीचा आदेश मोडून नाशिकमध्येच लपूनछपून राहत असल्याचे समोर आले आहे. अशा हुलकावणी देणाऱ्या तडीपारांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी (Police) आता विशेष ‘धरपकड’ मोहीम सुरू केली आहे.
निर्विघ्न आणि शांततापूर्ण वातावरणात उत्सव पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहरातील सर्व १४ पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पथकांना हायअलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तडीपारीचा आदेश मोडून शहरात फिरताना आढळणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अधिक कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, सणोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहीम तीव्र केली आहे. मुख्य बाजारपेठा, गणेश मंडळांचे परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस व विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. संशयितांची (Suspected) जागेवरच तपासणी करून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा माग काढला जात आहे.
लिहून घेणार प्रतिज्ञापत्र
गुन्हेगारीवर पूर्णपणे वेसण घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील दोन्ही परिमंडळ उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी, सरकारवाडा, सातपूर आणि नाशिकरोड विभागात प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका सुरू आहे. अमली पदार्थ विक्री, जुगार आणि अवैध दारू धंद्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १०७ आणि ११० अंतर्गत वर्तवणूक सुधारणा प्रतिज्ञापत्र (बॉण्ड) लिहून घेतले जात आहे. प्रतिज्ञापत्राचा भंग झाल्यास थेट तुरुंगात रवानगी केली जाणार असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात गुन्हेगारांवर अंकुश राहण्याची शक्यता आहे.




