नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्थानिक असल्याचे कारण पुढे करत आणि स्वतःला भाई दर्शवून रस्त्याच्या मध्यभागी कार उभी करून टाईमपास करणाऱ्या एका बिल्डिंग मटेरिअल सप्लायरची एमआयडीसी आणि शहर वाहतूक पोलिसांनी (Police) चांगलीच जिरवली आहे. रीलबाजी करण्यात पटाईत या मग्रुर संशयिताने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करुन गजाआड केले आहे.
विकास मारुती धुमाळ (वय ३२, रा. मनन मायरा रोड हाऊस रूम नं. ०७, डोंगरे नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे (Suspected) नाव आहे. एमआयडीसी पाेलीस ठाणे हद्दीतील गरवारे ते पपया नर्सरी मार्गावर सध्या सिंहस्थ विकास कामे आणि इतर विकासकामे सुरू आहेत. यामुळे या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या युनिट तीनचे हवालदार उत्तम गंगाधर भोपळे व इतर अमलदार शनिवारी (दि. २४) सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास गरवारे पॉईंट येथे शासकीय ड्यूटी व वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी संशयित विकास धुमाळ याने आपली मारुती ब्रीझा कार (क्र. एमएच ०२ ईपी ४०९४) रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केला. कर्तव्यावर असलेल्या भोपळे यांनी त्याला अनेकदा वाहन बाजूला घेण्यास सांगितले.
पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की
पोलिसांनी कार बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून, संशयित धुमाळ याने कार बाजूला घेऊन पुन्हा त्याच स्थितीत बाजूला लावली व भोपळे यांच्याशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्यांची कॉलर पकडून ओढून शर्टचे वरचे बटण तोडले, हाताने व बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. तसेच, तु मला ओळखले नाही का? तुझ्यासारखे पोलीस मला नमस्कार करतात, अशी भाषा वापरच गलिच्छ शिवीगाळ केली. मी इथला भाई आहे, तुझा गेमच करतो, अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
पोलिसांची कारवाई
सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांवर हात उगारण्याच्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. या प्रकरणी उत्तम भोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३२, २८५, ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने मग्रूर रीलबाज विकास धुमाळ याला बेड्या ठोकल्या आहेत. तपास उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड करत आहेत.




