नाशिक । प्रतिनिधी | Nashik
सायबर फसवणुकीतील (Cyber Fraud) पैसा (Money) थेट स्वतःच्या खात्यात न घेता, नाशिकमधील (Nashik) गरिबांची आणि गरजूंची बँक खाती ‘भाड्याने’ घेऊन चालणाऱ्या एका संघटित फ्राॅडचा नाशिक सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनेकदा नागरिक फसवणूक होऊनही समोर येत नसल्याचे पाहून, नाशिक सायबर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दोन गुन्हे दाखल केले आहेत. तब्बल ५५ लाख २२ हजार रुपयांच्या या ऑनलाईन फसवणुकीत (Online Fraud) नाशिकमधील ३३ बँक खात्यांचा वापर झाल्याचे समोर आले आहे.
’एनसीसीआरपी’ पोर्टलवरील डेटाच्या तांत्रिक विश्लेषणातून हे नाशिक कनेक्शन (Nashik Conection) उघड झाले असून, सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हे सायबर संशयित नागरिकांना फोन करून ‘तुमच्या नावाचे बेकायदेशीर पार्सल सापडले आहे’ किंवा ‘तुम्ही मनी लाँड्रिंगमध्ये अडकले आहात’ अशी भीती घालतात.
स्वतःला सीबीआय, कस्टम किंवा पोलीस अधिकारी भासवून ते व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ करतात आणि केस मिटवण्यासाठी लाखो रुपये उकळतात. तर घरबसल्या यूट्यूब व्हिडिओ लाईक करा, ‘टास्क पूर्ण करा’ किंवा ‘शेअर मार्केटमध्ये थेट १० पट परतावा मिळवा’ अशी आमिषे दाखवून नागरिकांना टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर जोडले जाते आणि सुरुवातीला नफा दाखवून नंतर मोठी रक्कम गुंतवण्यास (Investment) भाग पाडले जाते.
आयटी ॲक्ट सह ‘भारतीय न्याय संहिते’चा दणका
संशयित खातेधारक आणि आरोपींविरुद्ध केवळ माहिती तंत्रज्ञान कायदा नाही, तर थेट भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ३(५) आणि ३१८(४) अंतर्गत कठोर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सायबर पोलिसांचे हे पाऊल कौतुकास्पद असून, नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे.
प्रकरण १
महिला पोलिस अंमलदार केदराबाई पठारे यांच्या फिर्यादीनुसार ११ डिसेंबर २०२५ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत गुन्हा घडला. ४० लाख २३ हजार २९० रुपयांची एकूण फसवणूक असून संशयितांनी नाशिक शहरातील विविध बँकेतील १४ खात्यांचा वापर केला. या खात्यांमधून २१ वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये चेकचा वापर करून रक्कम काढली.
प्रकरण २
महिला पोलिस अंमलदार प्रतिभा पोखरकर यांच्या फिर्यादीनुसार १ जानेवारी २०२६ ते १६ जुलैपर्यंत गुन्हा घडला. १४ लाख ९८ हजार ७३५ रुपयांची फसवणूक असून संशयितांनी देशभरातील नागरिकांची फसवणूक केली. त्यासाठी विविध बँक खात्यात पैसे वळवण्यासाठी १९ स्वतंत्र बँक खात्यांचे जाळे तयार केले होते.




