नाशिक | प्रतिनिधी
अवैधरीत्या मेफेड्रोनची तस्करी करून त्याची नाशकातील ड्रग्ज पेडलरला विक्री करणाऱ्या ड्रग डिलरला अटक करण्यात आली. सदाशिव ऊर्फ शिव पाराजी गायकवाड (३४, रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव) असे संशयिताचे नाव आहे. शिव हा सराईत असून त्याच्यावर पूर्वी खून, घरफोडी व अन्य गंभीर गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, शिवला पुण्यातून ड्रग्ज पुरवणाऱ्या संशयित विक्रेत्यांचा शोध आता घेतला जात आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थविरुद्ध कारवाईत वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने नाशिक अंमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनडीपीएस) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांचे पथक काम करत आहे. कोल्हे यांना शुक्रवारी (दि. ६) ड्रग्ज डिलिंगची गोपनीय माहिती मिळताच पहाटे अशोका मार्गावर सापळा रचण्यात आला. तेव्हा पथकाने कारवाई करून दोन लाख ९७ हजार ५०० रुपयांचे एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या अजय भिका रायकर (३६), मोसिन हानिफ शेख (३६) व अल्ताफ पिरन शहा (३५, तिघे रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव) या संशयितांना अटक केली होती. त्यापैकी अजयला एमडी पुरवणारा संशयित आकर्षण रमेश श्रीश्रीमाळ (३०, भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट, तलाठी कॉलनी, पंचवटी) यालाही अटक करण्यात आली. चौघांना न्यायालयाने पुन्हा वाढीव पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पथकाने केलेल्या तपासात चौघांनी शिव गायकवाड याच्या नावाचा उलगडा करून तो ड्रग्ज पुरवत असल्याची कबुली दिली.
त्यानुसार सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर व पथकाने तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू केला होता. तो भूमिगत असतानाच बुधवारी (दि. ११) तो वडाळागावात येताच पथकाने त्याला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, अटकेतील पाचही संशयितांना न्यायालयाने आज शुक्रवार (दि.१३) पर्यंत पोलीस शुद्र कोठडी सुनावली आहे.
मिलीग्रॅमने एमडीची विक्री
अटकेतील चौघेही शिव याच्याकडून एक ग्रॅम एमडी २ ते अडीच हजार रुपयांत ठोक पद्धतीने खरेदी करत होते. यानंतर या एमडी पावडरचे ५०० ते ६०० मिलीग्रॅम म्हणजेच एक ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे मायक्रो पाकिटे तयार करून एक पाकीट साधारणतः पाचशे ते एक हजार रुपयांना विक्री करत होते. या मिलीग्रॅमच्या पाकिटाचे वजन वाढवण्यासाठी संशयित पेडलर एमडीसदृश पावडर किंवा अजिनोमोटो मिक्स करत होते, अशा पध्दतीची फसवी टॅक्निकदेखील या व्यवसायात वापरत असल्याचे उघड होत आहे. त्यादृष्टीनेही पथक तपास करत आहे.
एमडी ड्रग्जची तस्करी आणि विक्री पुणेमार्गे नाशकात सुरू होती, असे पथकाच्या कारवाईतून समोर आले आहे. दरम्यान, आकर्षण श्रीश्रीमाळ आणि शिव गायकवाड यांची ओळख कशी झाली याचा तपास सुरू असून शिव हा पुण्यातून व व नाशकात कोणाच्या वरदहस्ताने एमडीचा सप्लाय करत होता, यासाठी पथक लवकरच पुण्यात जाऊन धडकणार आहे. त्यासाठी वडाळागावातही तपास केला जाणार आहे.
मुद्दे
- शिव हा सध्या ड्रग्ज विक्रीचा मुख्य डिलर
त्याला ड्रग्ज पुरवणाऱ्या मास्टर माईंडसह साखळीचा शोध
आकर्षणचा दुसरा विवाह; आई-वडील नाहीत
ट्रान्सपोर्ट व्यवसायातून आकर्षणची शिव आणि रायकरशी ओळख
स्लम एरिया, टवाळखोरांना एमडीची विक्री
ठराविक व ओळखीतील व्यक्तींशी संपर्क
सौदाबाजी रोख स्वरुपातच