नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एक जबरी चोरी आणि चोर-पोलिसांच्या (Police) लपाछपीचा थरार नाशिकमधून उघडकीस आला आहे. सातपूर भागात एका मोठ्या ‘गोल्डमॅन’ला लुटून मालामाल होण्याचे स्वप्न पाहिलेल्या तीन अट्टल चोरांच्या हाती अखेर एक ‘टेलर’ असलेला गोल्डमॅन लागला. पण या लुटीनंतर संशयितांनी पोलिसांना तब्बल ७३ दिवस ज्या पद्धतीने हुलकावणी दिली आणि मौजमजा केली, त्याचा एक नवा पैलू आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील (Nashik) सराईत चाेर संभाजी विलास कवळे (वय ३०, रा. तुळजा भवानी, आनंदवली) आणि त्याच्या दोन साथीदारांनी नाशिकच्या सातपूर परिसरात एका मोठ्या जबरी चाेरीचा प्लॅन आखला. २३ मार्च २०२६ रोजी रात्री व्यवसायाने टेलर असलेल्या आणि अंगावर सोन्याचे दागिने मिरविण्याचा हाैस असलेल्या व्यक्तीला गाठून, चाकूचा धाक दाखवत त्यांनी गळ्यातील सोन्याच्या चेन बळजबरीने हिसकावून घेतल्या व पळ काढला. गुन्हा केल्यानंतर या टोळीने (Gang) चोरी केलेले सुमारे १५ ते २० लाख रुपये किमतीचे सोने जळगाव (भुसावळ/बोदवड) भागातील एका सराफाला विकले. हाती पैसा येताच या चाेरांनी पोलिसांच्या भीतीने पळून जाण्याऐवजी चक्क ‘टूरिझम प्लॅन’ आखला.
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी एक खाजगी कार भाड्याने घेतली आणि धुळे, नंदूरबार, मुंबई, पुणे करत थेट निसर्गरम्य कोकण गाठले. धक्कादायक बाब म्हणजे, या तिघांनी आपल्या हिश्श्याला आलेले मूळ पैसे बाजूला ठेवून, केवळ संपूर्ण कोकण फिरण्यासाठी आणि तेथील ऐषारामासाठी तब्बल दीड ते दोन लाख रुपये खर्च केले. एका बाजूला पोलिस वेगवेगळ्या जिल्ह्यांत त्यांचा शोध घेत होते आणि दुसऱ्या बाजूला हे संशयित समुद्रकिनाऱ्यांवर चोरीचे पैसे (Money) उडवत होते.
पोलिसांची ‘डबल शिफ्ट’ आणि थरारक अटक
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पाेलिस उपायुक्त किशाेर काळे, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट दाेनचे सहाय्यक निरीक्षक हेमंत ताेडकर व उपनिरीक्षक आजीनाथ बटुळे यांच्या पथकांनी मागील दीड ते दोन महिन्यांपासून जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे छापे टाकले. दरम्यान, हे चाेरटे चाणाक्ष असल्याने पोलिस पोहोचण्याच्या काही वेळ आधीच ते ठिकाण बदलून पळत हाेते, असेही समाेर आले आहे. अखेर २८ मे २०२६ रोजी पोलिसांनी आरटीओजवळील परिसरातून संभाजी कवळे याला बेड्या ठोकल्या.
मुद्दे
- – सराफाकडून १४ लाख रुपयांची १०५ ग्रॅम सोन्याची लगड जप्त
- – सराफा आणि साथीदारांचा शोध सुरू
- – कवळे सातपूर पोलिसांच्या कोठडीत
- – जबरी चाेरीच्या पैशातून ‘लाॅंगड्राईव्ह’
– लुटीच्या पैशातून ‘टूरिस्ट’ बनून फिरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश




