नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लॅपटॉप चोरीच्या एका गुन्ह्याचा कसून तपास करत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) रेल्वे स्थानक परिसरात यशस्वी सापळा रचून दोन संशयितांना जेरबंद केले आहे. या कारवाईत नाशिकराेड रेल्वे पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, यामध्ये महागड्या लॅपटॉपसह मोबाईलचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी योगेश ज्ञानेश्वर पाटील (रा. चोपडा) यांचा लॅपटॉप असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याचा समांतर आणि तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी नाशिक रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. या कारवाईत नागेश रतन पाझरे (वय ३८, रा. अकोली जहागीर, ता. अकोट, जि. अकोला) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
कसून चौकशी केली असता त्याने लॅपटॉप चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला ७० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केला. तपासाचा धागा पकडत पोलिसांनी या गुन्ह्यात (Case) आणखी एकाला बेड्या ठोकल्या. गणेश पपू साळवे (वय २४, रा. सोमवार बाजार, देवळाली गाव) असे या दुसऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १३ हजार रुपये किमतीचा’ मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांची कामगिरी
पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहायक निरीक्षक सचिन बनकर, आरपीएफ पोलीस निरीक्षक नवीन सिंग, सहायक फौजदार संतोष उफाडे पाटील, हवालदार शैलेश पाटील, योगेश पाटील, महिला हवालदार सरला बिरोटे, पोलीस कर्मचारी गणेश कांबळे, सागर वर्मा आणि एमएसएफ कर्मचारी राहुल चौधरी यांनी केली.




