नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर (Engineering Girl Student) अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत (Arrested) असलेला संशयित तंजिर इनामदार याच्या पोलिस कोठडीत दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. व्ही. भराडे यांनी शनिवारपर्यंत (दि. २५) तीन दिवसांची वाढ केली आहे. तंजिरचे कट्टरतावादी संघटनांशी लागेबांधे आहेत का आणि ‘गजवा-ए-हिंद’च्या अनुषंगाने सखोल तपास करण्याची गरज असल्याचे तपासअधिकाऱ्यांसह सहाय्यक सरकारी अभियाेक्त्यांनी न्यायालयात सांगितले.
बुधवारी (दि. २२) पहिल्या टप्प्यातील पोलिस कोठडीची (Police Custody) मुदत संपल्याने तंजिरला पंचवटी पाेलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मनीषा वारुंगसे यांनी तपासाचे मुद्दे मांडताना तंजिरचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातील सोशल मीडिया अकाउंट्स आणि डेटाची पडताळणी सुरू आहे. तंजिरने अशाच प्रकारे अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याचा संशय असून, भीतीपोटी त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा काही संबंध आहे का? ‘गजवा-ए-हिंद’चा नेमका प्रकार काय? आणि तंजिरचे कोणत्या कट्टरतावादी संघटनांशी व धर्मगुरुंशी आर्थिक किंवा वैचारिक लागेबांधे आहेत का? याचा सखोल तपास करण्यासाठी पाच दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. तर, दुसरीकडे, तंजिरचे वकील ॲड. स्वप्निल जाधव यांनी युक्तिवाद करताना, संशयित तंजिरचा मोबाईल आणि कपडे आधीच जप्त करण्यात आले आहेत. तो उच्चशिक्षण घेणारा विद्यार्थी असून केवळ प्रेमप्रकरणातून हे आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने (Court) तंजिरला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नेमके प्रकरण काय?
जळगाव येथील २१ वर्षीय तरुणी नाशिकमधील (Nashik) एका नामांकित महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून, ती वसतिगृहात वास्तव्यास आहे. तिच्या फिर्यादीनुसार, संशयित तंजिर इनामदार याने जून २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत म्हसरूळ व पंचवटी परिसरातील महाविद्यालय परिसर, दिंडोरी रोडवरील उद्यान आणि विविध हॉटेल्समध्ये अत्याचार केले, असे नमूद आहे.
गंभीर आरोप
फिर्यादीनुसार, संशयित पीडितेवर बळजबरी करायचा आणि तिला ‘लव्ह बाइट’च्या नावाखाली इजा करायचा. पीडितेला सिगारेट पिण्याची आणि मद्यपानाची सक्ती करून तिचे अश्लिल फोटो काढल्याचाही आरोप आहे. विशेष म्हणजे, अत्याचार करताना पीडितेच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि हातातील धागे काढून तिला एका विशिष्ट धर्माप्रमाणे कृती करण्यास भाग पाडल्याचे नमूद आहे. तंजिरच्या मोबाईल डेटातून काही मिळते का याचा तपास सुरु झाला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती आमणे तपास करत आहेत.





