नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने नाशिक शहरात (Nashik City) सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यात पाणी, रस्ते, गटार, रिंग रोड, विज, आरोग्य अशी कामे सुरू आहेत. तथापि या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून येत आहे. यात तथ्य देखील आहे. या समस्या व तक्रारी कमी जास्त प्रमाणात सर्वत्र आहेत. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी (Corporators) आपापल्या प्रभागात, परिसरात सुरु असलेल्या विकासकामांवर लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारी सोडवाव्यात, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “ठेकेदारांनी कामे करतांना तत्परतेने, दर्जेदार दिलेल्या मुदतीत केली पाहिजे. ते तसे करत नसतील तर मनपा आयुक्त प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अशा कामचुकार व चुकीच्या ठेकेदारांना काळया यादीत टाकावे. सध्या वर्तमान पत्रात व टीव्ही चॅनलवर नगरसेवक लोकप्रतिनिधी बाबत उलटसुलट व चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे शहरात चुकीचा संदेश जात आहे. जर ४० हजार मतदारांच्या (Voters) प्रभागामधून नगरसेवक निवडून येत असतील तर त्यांनाही त्यांच्या प्रभागात मतदार जाब विचारणारच. अशा प्रसंगी पराचा कावळा न करता ठेकेदारांनी आपली जबाबदारी ओळखून कामे वेळेत व दर्जेदार केलीच पाहिजे”, असेही केदार यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या सहाव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजर करणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?
पुढे त्यांनी म्हटले की,”काही ठेकेदार नगरसेवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पूर्णतः चुकीचे आहे. अशा चुकीच्या ठेकेदारांना सुध्दा मनपा आयुक्त व प्रशासनाने पाठीशी घालू नये. सध्या ज्या उलटसुलट बातम्यांमुळे (News) नगरसेवकांभोवती जे संशयाचे वातावरण तयार होत आहे तसे होऊ देऊ नये. नगरसेवकांना सुध्दा त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव आहे. नाशिक मनपा आयुक्तांनी याबाबत पूर्ण शहानिशा केल्याशिवाय नगरसेवकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करू नये”, असे केदार म्हणाले.
तसेच “महापालिका निवडणुकीत (NMC Election) भारतीय जनता पक्षाला ७२ जागा मिळाल्या व पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने भाजपची एकहाती सत्ता महापालिकेत आली. वास्तविक भाजपने या निवडणुकीत १०० प्लसचा नारा दिला होता. मतांची आकडेवारी व टक्केवारी पहाता त्याप्रमाणे भाजपचे १०० प्लस नगरसेवक निवडूनही आले असते. परंतु राजकारणात काही आडाखे चुकत असतात. तथापि निवडून आलेल्या नगरसेवकांकडून नाशिककर नागरिकांच्या विकासाबाबत अपेक्षा आहेत.४ वर्षे निवडणुका न झाल्यामुळे नाशिक महानगर पालिकेत प्रशासक राज होते. त्यामुळे नागरिकांना स्थानिक हक्काचा लोकप्रतिनिधी नव्हता. आता नागरिकांना आपापल्या भागात, प्रभागात सर्वत्र नगरसेवक उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच ते आपल्या भागातील समस्या, अडचणी, कामे नगरसेवकांना सांगतात”, असेही सुनील केदार यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : ‘कॅप्टन’च्या कृत्यांचा ‘नवा पत्ता’; खरातचे धागेदोरे पोहोचले नाशिकमधील एका आलिशान हॉटेलपर्यंत





