जेलरोड | प्रतिनिधी | Jailroad
जेलरोड परिसरात (Jaliroad Area) फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोयता गँगविरुद्ध उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) धडक कारवाई करत सात संशयितांना अटक केली. अटकेनंतर आरोपींची कॅनल रोड व कैलासजी सोसायटी परिसरातून धिंड काढण्यात आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे. या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतूक केले आहे.
रविवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून फळ विक्रेता इम्तियाज इसरार खान (वय २७, रा. मगर चाळ, कॅनल रोड) यांच्यावर सात ते आठ जणांच्या टोळीने धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी भर रस्त्यात शस्त्रांचे प्रदर्शन करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. घटनेनंतर इम्तियाज खान यांनी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) फिर्याद दाखल केली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत सोहेल पठाण, जुनेद सैय्यद, यश वाबळे, अभिजीत साळवे, विनोद घुगे यांच्यासह अन्य दोन संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर आरोपींची कॅनल रोड व कैलासजी सोसायटी परिसरातून कडेकोट पोलीस बंदोबस्तात धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा धाक निर्माण झाला असून, कायदा हातात घेणार्यांविरूद्ध कठोर भूमिका कायम राहणार असल्याचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, कॅनल रोड परिसरात घरांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांचाही शोध सुरू असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली. तसेच गुन्हेगारांबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन त्यांनी केले. या कारवाईत पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनवणे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जेलरोडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर अंकुशाची अपेक्षा
गेल्या काही दिवसांपासून जेलरोड परिसरात हाणामारी, दगडफेक व शस्त्रांच्या धाकाने दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी नियमित पोलीस गस्त, संशयितांवर वचक आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. उपनगर पोलिसांनी केलेल्या ताज्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.




