Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : एमडीच्या तपासात 'पाॅपी स्ट्राॅ'च्या गँगचा पर्दाफाश; धुळ्यातून ८२...

Nashik Crime News : एमडीच्या तपासात ‘पाॅपी स्ट्राॅ’च्या गँगचा पर्दाफाश; धुळ्यातून ८२ किलो डोडा जप्त

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात पसरत चाललेल्या अंमली पदार्थांच्या विळख्याची पाळेमुळे थेट राजस्थानपर्यंत पोहोचल्याचा प्रकार नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) कारवाईत समोर आला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) विक्रीच्या गुन्ह्याचा माग काढतांना नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) तब्बल ४०० किलोमीटरचा पाठलाग करून पाॅपी स्ट्राँ विक्री करणाऱ्या बिश्नोई गँगच्या मुख्य सूत्रधारांना धुळे जिल्ह्यातील (Dhule District) साक्री येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा अँगल समोर आला असून, पोलिसांनी १२ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

​उपनगर पोलीस ठाण्यात १८ जून रोजी ‘एमडी’ ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या राजस्थानातील (Rajsthan) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये एनडीपीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासासाठी राजस्थानमध्ये तपासासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांना सुगावा लागल्याचे समजताच मुख्य संशयित भरत भिकाराम बिश्नोई व सुरेश बिश्नोई यांनी राजस्थानमधून पळ काढून महाराष्ट्राकडे धाव घेतली. पथकाने माेबाईल लोकेशन ट्रॅक करत राजस्थान ते महाराष्ट्र असा ४०० किलोमीटरचा थरारक पाठलाग केला. संशयित आरोपी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील हॉटेल समरथा (कोंढाईबारी) येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून भरत आणि सुरेश बिश्नोई यांना बेड्या ठोकल्या.

त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांचा तिसरा साथीदार मुकेश गोवर्धनराम बिश्नोई याने साक्री येथील सुयोग कॉलनीतील घरात मोठ्या प्रमाणावर डोडा (पॉपी स्ट्रॉ) लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या घरावर छापा (Raid) मारला असता ५ काळ्या रंगाच्या गोण्यांमध्ये एकूण ८२ किलो २६४ ग्रॅम वजनाचा डोडा आढळून आला. या कारवाईत अंमली पदार्थांसह १ लाख ५० हजार रुपयांची रोकड, वजन काटा आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण १२ लाख ३३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

राजस्थानी स्विटस कामगार अन् ढाबे ‘रडार’वर!

​तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राजस्थानातून आग्रा रोड मार्गे इंदूर, राजस्थान आणि अजमेरकडे जाणाऱ्या ट्रक चालकांना या ‘डोडा’ (पॉपी स्ट्रॉ) या अंमली पदार्थाचे मोठे व्यसन जडल्याचे उघड झाले आहे. हायवेवरील काही ढाबे, गॅस रिपेअरिंग करणारे कारागीर आणि काही राजस्थानी स्वीट्स दुकानांमधील कामगार या नशेच्या विळख्यात अडकले असून, त्यांनाच केंद्रबिंदू बनवून ही बिश्नोई गँग महाराष्ट्रात अंमली पदार्थांचे जाळे पसरवत होती. या संपूर्ण साखळीचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पाॅपी स्ट्राॅ (डोडा) म्हणजे काय?

​पाॅपी स्ट्राॅ म्हणजेच खसखशीच्या झाडाची (अंमली पदार्थ देणाऱ्या पिकाची) बोंडे. या झाडाची फुले गळल्यानंतर उरलेल्या बोंडांमधून अफीम काढले जाते. अफीम काढल्यानंतर शिल्लक राहिलेली वाळलेली बोंडे आणि त्यांच्या देठांचा भाग मिक्सरमध्ये बारीक करून हा अंमली पदार्थ तयार केला जातो. स्थानिक त्याला भाषेत ‘डोडा’ किंवा ‘पोस्त’ म्हणतात. हा अत्यंत घातक व नशा आणणारा अंमली पदार्थ असून, भारतात एनडीपीएस कायद्यान्वये याच्या विक्रीवर व बाळगण्यावर पूर्ण बंदी आहे. झाेप, अंगदुखी खालविण्यासाठी या पदार्थाचे सेवन केले जाते. 

मुद्दे

​नाशिक पोलिसांचा ४०० किलोमीटर पाठलाग.
​’एमडी’ तपासात राजस्थान कनेक्शन उघडकीस
​धुळ्यात बिश्नोई गँगचे दोन संशयित गजाआड.
​८२ किलो डोडा आणि वाहने जप्त.
​परराज्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा ब्रेक

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...