नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल सिग्नल ते मधुबन कॉलनीदरम्यान रात्रीच्या वेळी टवाळखोर, उपद्रवी आणि मद्यपींनी उच्छाद मांडला असून, स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. पोलिसांची गाडी नियमितपणे राऊंड मारत असली, तरीही या टवाळखोरांवर पाऊण टक्काही धाक राहिलेला नाही, अशी संतापजनक व नित्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
ड्रीम कॅसल सिग्नलच्या अगदी बाजूलाच मद्यालय (वाइन शॉप) व लहान-मोठे खाद्यपदार्थ विक्रेते हातगाड्या लावत असल्याने या टवाळांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री नऊनंतर तर हा संपूर्ण रस्ता जणू या उपद्रवी घटकांनी ताब्यात घेतल्याचे चित्र असते. ड्रीम कॅसल बिल्डिंगसह बाजूच्याच एका रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यांवर बसून हे टवाळखोर सर्रास मद्य प्राशन करत ओपन बार मांडतात.
यामुळे रात्रीच्या वेळी शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास व असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. भीतीपोटी अनेकांनी तक्रारी नोंदविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा पुरेपूर फायदा हे टवाळखोर घेत आहेत. या भागात येऊन उच्छाद मांडणाऱ्या आणि महिलांची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टवाळखोरांना जागीच चोप देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मधुबन कॉलनी व मखमलाबादरोड परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
पोलिसांची केवळ सायरनवारी!
पोलीस रात्री येतात, सायरन वाजवतात आणि निघून जातातफ परंतु रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्या किंवा रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांना बंद करण्याच्या साध्या सूचनाही पोलिसांकडून दिल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पंचवटी पोलिसांची ही ढिलाई टवाळांच्या पथ्यावर पडत आहे.
बेफाम वाहनांची हुल्लडबाजी
ड्रीम कॅसल सिग्नल ते थेट चैतन्य बेकरीपर्यंत रात्रीच्या नऊ ते एक वाजेपर्यंत महागड्या कार आणि दुचाकीवरून बेफाम वेगाने धावून कर्णकर्कश आवाज काढले जातात. या हुल्लडबाजीमुळे येथील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवनाथनगर, हनुमानवाडी, क्रांतीनगर, मधुबन कॉलनी, वडजाईमातानगर, पंचवटी आणि मखमलाबाद परिसरातील काही सराईत व टवाळखोर येथे एकत्र येतात.




