
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक करुन केलेल्या ‘शालार्थ’ घोटाळ्यातील (Shalarth ID Scam) संशयित तथा भाजप पदाधिकारी आणि शिक्षण संस्था चालक संजय भास्कर गरूड याला नाशिकरोड (Nashik Road) अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, त्याचा भाऊ व शिक्षण संस्थेचा सचिव दीपक गरूड याच्यासह संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) कसून चौकशी सुरू असून तपासाची व्याप्ती वाढली आहे.
मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल झालेल्या या गुन्ह्यात नाशिक विभागातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘शालार्थ आयडी’ बनावट असल्याचे समोर आले आहे. यापैकी तब्बल ६३८ कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात संजय गरूड हा सहावा संशयित असून त्याला २७ जुलै रोजी सोलापूर येथून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन (Court) कोठडी सुनावली. त्याचवेळी त्याच्या उर्वरित पोलिस कोठडीचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, दीपक गरूड याला २९ जुलै रोजी अटक करण्यात आली असून त्याची पोलिस कोठडी ३ ऑगस्टपर्यंत आहे. एसआयटीकडून त्याच्यासह संस्थेच्या १५ शाळांपैकी आठ शाळांच्या मुख्याध्यापकांची चौकशी सुरू आहे. शिक्षकांकडून किती रक्कम उकळण्यात आली, बनावट शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया कशी राबविण्यात आली आणि संस्थेतील कागदपत्रांमध्ये कोणत्या प्रकारची फेरफार करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. तपासात संजय गरूड याने १७७ शिक्षक व कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १४१ जणांचे नियुक्ती आदेश २८ ऑगस्ट २०१९ या एकाच दिवशी काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची बाबही तपासात समोर आली आहे. धुळ्यातील शिक्षण संस्था चालक प्रशांत वाडिले याला अटक झाल्यानंतर संजय गरूड सोलापुरात लपून बसल्याचेही तपासातून उघड झाले होते.
उपासनीचा पुन्हा अर्ज
गुन्ह्यातील संशयित नितीन उपासनी याने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावरील पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच संशयित भाऊसाहेब चव्हाण, मीनाक्षी गिरी, प्रदीप शिंगणे, अतुल पवार, राहुल पवार, उमेश पवार, मनिष कदम, किरण कुवर, प्रवीण अहिरे, भास्कर पाटील, देविदास महाजन, अनिवाश पाटील, मनोज पाटील आणि शरद शिंदे या १४ संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ७ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचे कळते.




