पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नवीन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापोटी गहाण ठेवलेले तब्बल १४१.५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) मुद्दल रक्कम परत करूनही न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित सराफ योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील नायगरा सोसायटी, लोकसहकार नगर येथील रहिवासी व्यावसायिक भोलाचंद मेवालाल गुप्ता (वय ४३) यांना नवीन व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता होती. यातून त्यांनी २२ फेब्रुवारी २०२६ ते आजपावेतोच्या कालावधीत ओळखीचे सराफ योगेश दाभाडे यांच्याकडे स्वतःचे, पत्नीचे व मुलांचे मिळून १४१.५५ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले. दाभाडे याने कोणताही सावकारी परवाना नसताना ४ टक्के दरमहा व्याजदराने गुप्ता यांना १३ लाख रुपये दिले होते.
मुद्दल फेडली, तरी दागिने हडपले
फिर्यादी गुप्ता यांनी मित्र अजय जितेंद्र गुजराथी यांच्यासमक्ष १३ लाख रुपयांची मुद्दल रक्कम वेळोवेळी दाभाडे यास परत केली. तरीही संशयिताने दागिने परत न करता त्यांची परस्पर विल्हेवाट लावत विश्वासघात व फसवणूक केली. याप्रकरणी गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) भारतीय न्याय संहिता कलम सह महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ च्या कलम ३९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
माजी महापौरांच्या समर्थकाची तक्रार; राजकीय वर्तुळात चर्चा
संशयित आरोपी योगेश दाभाडे हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दाभाडे याने सर्वप्रथम माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या त्रासाला कंटाळून फिनेल पिऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात मुर्तडक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कालांतराने मुर्तडक कुटुंबातील महिलांची सुमारे १०० तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी दाभाडेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता दाखल झालेल्या या ताज्या गुन्ह्यातील फिर्यादी मोलाचंद गुप्ता हे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे कट्टर समर्थक मानले जात असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.




