
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पोलिसांवर आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित सद्दाम शेख (Saddam Shaikh) याचे गुन्हेगारी कारनामे आता एकामागून एक समोर येऊ लागले आहेत. जमिनीवर ताबा मारून पाच कोटींची खंडणी मागितल्याचा पहिला गुन्हा (Case) दाखल झाल्यानंतर, आता सद्दाम शेख आणि त्याच्या आईवर अनधिकृत सावकारी, अपहरण, मारहाण आणि ५० लाखांच्या खंडणीचा दुसरा गंभीर गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
२० लाख रुपयांच्या कर्जापोटी (Loan) तब्बल ४८ लाख रुपये व्याज वसूल करूनही फिर्यादीला कारमध्ये बसवून अपहरण करत चार तास डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमृतधाम येथील व्यावसायिक विजय पुंडलिक शिरोडे (वय ४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित सद्दाम बाबू शेख आणि त्याची आई लता बर्डे (दोघे रा. अमृतधाम, पंचवटी) यांनी सन २०२१ ते आजतागायत बेकायदेशीर सावकारी व्यवसाय चालवून शिरोडे यांच्याकडून २० लाखांच्या मुद्दलावर ४८ लाख रुपयांचे व्याज उकळले.
काही दिवसांपूर्वी आरोपींनी फिर्यादी शिरोडे यांना भगवती हॉटेल परिसरात बोलावून घेत मारहाण केली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अमृतधाम (Amrutdham) येथील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेले. तेथे चार तास डांबून ठेवत मुद्दल व व्याज बाकी असल्याचे सांगून आणखी ५० लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी केली. पैसे न दिल्यास फिर्यादी व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.
प्लॉटचा ताबा आणि ‘ॲट्रॉसिटी’ची धमकी
संशयितांनी फिर्यादीच्या मनात मृत्यूची भीती घालून सर्व्हे नं. २६१/२ मधील प्लॉटच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. एवढेच नव्हे तर, प्लॉटचा बेकायदेशीर ताबा मिळवला. या प्लॉटवर लता बर्डे हिने ताबा मिळवून न दिल्यास सद्दाम शेखच्या सांगण्यावरून खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक कैलास जाधव पुढील तपास करत आहेत.
सद्दामची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडी
काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी घरझडतीचा बहाणा करून छळ केल्याचा व बेकायदेशीर बसवून ठेवल्याचा आरोप सद्दाम शेखने केला होता. मात्र, प्रथम के. के. वाघ ॲग्रीकल्चर कॉलेजसमोरील कोट्यवधींच्या जमिनीवर ताबा मारून श्रीकांत कुलकर्णी यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यापाठोपाठ आता अवैध सावकारी, अपहरण आणि ५० लाखांच्या खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने, पोलिसांवर आरोप करून स्वतःचा बचाव करणारा सद्दाम शेख प्रत्यक्षात मोक्याच्या जमिनी आणि कर्जदारांना टार्गेट करणारी टोळी चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.




