
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काजू प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या (Investment) बहाण्याने नाशिक शहरातील (Nashik City) भाजप मेडिकल सेलच्या पदाधिकाऱ्याला आधी ४६ लाखांना गंडा घातला असतानाच संशयित कुटुंबाने याच पदाधिकाऱ्याला एका गंभीर गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी पुन्हा ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित अमृतकर पितापुत्रांसह टोळीने अन्य साथीदारांच्या मदतीने हा डबल गेम खेळल्याचे समोर आले असून, आता गंगापूर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फिर्यादी मयूर प्रकाश अलई (वय ४४, रा. गार्डन व्हव्ह, गुलमोहर कॉलनी, पाईपलाईन रोड, गंगापूर रोड) हे हे भाजपच्या (BJP) मेडिकल सेलचे पदाधिकारी असून व्यावसायिक आहेत. हा संपूर्ण प्रकार सप्टेंबर २०२२ ते मे २०२६ या कालावधीत घडला आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये संशयित राजेंद्र अमृतकर आणि त्याच्या मुलाने अलई यांना काजू प्रक्रिया उद्योगात नफ्याचे आमिष दाखवून ४६ लाख रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी अमृतकरांवर गंगापूर पोलिसांत (Gangapur Police Station) आधीच पहिला गुन्हा दाखल आहे.
हा वाद सुरू असतानाच, धुळे जिल्ह्यातील (Dhule District) सोनगीर पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे, त्यात मयूर अलई हे देखील सहसंशयित आहेत. याच संधीचा गैरफायदा अमृतकर टोळीने उठवून अलई यांना धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोनगीर पोलिसांत दाखल गुन्ह्यातून अलई यांचे नाव वगळण्यासाठी संशयितांनी ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अमृतकर पितापुत्रांसह इतरांनी मध्यस्थ प्रमोद डेरे याच्या मोबाईल क्रमांकावरून तसेच प्रत्यक्ष भेटून अलई यांच्याकडे ही खंडणी मागितली.
ही रक्कम दिली नाही, तर अलई आणि त्यांच्या कुटुंबाचे (Family) जिवाचे बरेवाईट करण्याची, तसेच जीवे मारण्याची धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. यानंतर अलई यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गंगापूर पोलिसांनी (दि. २९) भारतीय न्याय संहिता कलमानुसार खंडणी आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या सूचनेने उपनिरीक्षक भटू पाटील करत आहेत.
गुन्ह्यातील संशयित
१) राजेंद्र अमृतकर (वय ५५, रा. सोनगीर, धुळे), २) योगिता अमृतकर (वय ४५), ३) गायत्री श्रीरंग कोठावदे (वय ३५, मुलगी), ४) प्रसाद राजेंद्र अमृतकर (वय २५, मुलगा), ५) मधुकर भोकरे (वय ६५, रा. पाचोरा, जळगाव), ६) मनोज दशपुते (वय ४५, रा. कासारे, ता. साक्री, धुळे), ७) प्रमोद डेरे (वय ५०, रा. सोनगीर, धुळे)




