नाशिक | Nashik
जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकमधील भागवत कुटुंबावर टवाळखोरांनी रविवार (दि.१२ जुलै) रोजी तरुणीच्या (Girl) छेडछाडीला विरोध केल्यामुळे त्यांच्या गाडीचा तब्बल १५ किमी पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या थरारक हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
दरम्यान या हल्ल्यानंतर भागवत कुटुंबाने अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) गाठत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलून अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवत इगतपुरी तालुक्यातील नऊ जणांना विविध भागातून अटक केल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! भावली धरण परिसरात पर्यटकांवर गुंडांचा हल्ला; १५ किमी पाठलाग करत गाडीची काच फोडली
यावेळी ते म्हणाले की, भावली धरण (Bhavali Dam) परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर हल्ला करून विनयभंग केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण इगतपुरी तालुक्यातील रहिवासी असून, यातील एक जणावर खुनाच्या गुन्ह्याची नोंद आहे. तसेच या सर्वांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आकाश भोईर, तुषार कडू आणि कैलास भागडे यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
दरम्यान, संशयित आरोपी हे इगतपुरी तालुक्यातील गिरणारे, नांदगाव सदो, माणिकखांब, बलायदुरी आणि देवळे घोटी या गावांतील रहिवासी आहेत. तसेच भोईर, कडू आणि भागडे फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केली.
संशयितांची नावे
विशाल मच्छिंद्र भटाटे (वय २७), अनिकेत गणेश मानवेढे (वय २४),अनिरुद्ध विठोबा भागडे (वय २५), सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (वय २२), विनोद लक्ष्मण बोराडे (वय २६), सचिन दत्तू आडोळे (वय २९), अर्जुन चिंधू आडोळे (वय २५), देविदास कचरू भगत (वय २५), आणि अजय भूषण दालभगत (वय २०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
नाशिक शहरात (Nashik City) राहणाऱ्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. पर्यटन आटोपून परतत असताना दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली. या प्रकारावर भागवत आणि त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी वाद घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी प्रतिकार केल्यावर ते तिथून पळून गेले.
काही अंतरावर उभा असलेल्या एका टेम्पो जवळील ८ ते १० जण पुन्हा भागवत कुटुंबाशी हुज्जत घालू लागले. वाद वाढू नये म्हणून भागवत कुटुंब आपल्या टाटा सफारी गाडीतून तिथून निघून गेले. मात्र, चिडलेल्या टवाळखोरांनी एका पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून आणि दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. गुंडांनी जवळपास १५ किलोमीटरपर्यंत गाडीचा थरारक पाठलाग केला. हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन धावत्या गाडीवर ठिकठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात सफारी कारच्या समोरील आणि मागील काचा पूर्णपणे फुटल्या. गाडीत बसलेल्या महिलांना काचा लागून किरकोळ दुखापतही झाली आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत चालकाने प्रसंगावधान राखत गाडी वेगाने पळवून थेट अंबड पोलीस ठाणे गाठले.




